सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख अमृत महोत्सव व्हॉलीबॉल चषक स्पर्धेचा लाभ घ्या – रामेश्वर बिरादार

उदगीर (एल.पी.उगीले)
माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे खेळ व खेळाडू यांच्याविषयीचे क्रीडा विषयक प्रेम सर्वपरिचित आहे,त्यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत लातुरात रेणा साखर कारखाना व लातुर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या वतीने भव्य अश्या निमंत्रित पुरुष व महिला संघाच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 16 ते 18 एप्रिल दरम्यान आयोजित केल्या जात आहेत.या स्पर्धेमुळे व्हॉलीबॉलचे हब असलेल्या लातूरला नक्कीच आणखीन बळ मिळणार आहे. या संधीचा लातूर जिल्ह्यातील सर्व क्रीडा रसिकांनी आणि खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे नेते रामेश्वर बिरादार जकनाळकर यांनी केले आहे.
लातूर जिल्हा होण्यापूर्वी उस्मानाबाद जिल्हा हा व्हॉलीबॉल चा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. विशेषतः उदगीर शहरातील अनेक व्हॉलीबॉलपटूंनी देशभर आपले नाव गाजवले होते. मग ते पुदाले असतील, केंद्रे गुरुजी किंवा शिवलिंग बिरादार गुरुजी आणि त्यांचे सहकारी यांनी महाराष्ट्रात उदगीर चे नाव व्हॉलीबॉल चे उत्कृष्ट खेळाडू म्हणून गाजवलेले होते. उदगीर मध्ये ही खेळाची परंपरा कायम राहावी म्हणून तत्कालीन आमदार स्वर्गीय चंद्रशेखर भोसले यांनी व्हॉलीबॉलच्य राज्यस्तरीय स्पर्धा वेळोवेळी घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि नवदितांना आवड निर्माण होईल अशा पद्धतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला होता.
त्यावेळी लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब हे मुख्यमंत्री होते त्यांनी शासनाच्या विविध क्रीडा स्पर्धा उदगीर आणि लातूरमध्ये घेऊन क्रीडा क्षेत्राला जिवंत ठेवण्याचे मोठे कार्य केले होते तोच आदर्श कायम ठेवून कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भव्य दिव्य अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे याचा लाभ जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी घ्यावा असेही आवाहन रामेश्वर बिरादार जकनाळकर यांनी केले आहे.
या व्हॉलीबॉल चषक क्रीडा स्पर्धामुळे नवोदित खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार आहे.स्पर्धेची जय्यत तयारी सुरू असून लातूरच्या क्रीडा रसिकांना मेजवानी मिळणार आहे. जिल्हाभरातून व्हॉलीबॉल प्रेमींनी याचा आनंद लुटावा असेही बिरादार यांनी आवाहन केले आहे.