सामाजिक समतेचा विचार म्हणजे शाहू-फुले-आंबेडकरांची शिकवण – प्रा. गायकवाड

उदगीर, (एल.पी.उगीले) महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित सामाजिक समता सप्ताहाच्या विशेष व्याख्यानात छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय उदगीर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.व्ही.डी.गायकवाड यांनी शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा सामाजिक समतेवरील विचार मांडताना उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. आपल्या भाषणात प्रा. गायकवाड म्हणाले की, “शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी आपल्या संस्थानाचा प्रभावी वापर केला. गौतम बुद्ध आणि महावीर वर्धमान यांच्या विचारसरणीत जातीय लवचिकता निर्माण करण्याची क्षमता होती. या सर्व महापुरुषांचे विचार आणि आचार समान असल्यामुळे ते सर्व धर्मातील लोकांसाठी आदर्श ठरले. आज समाजाने जातीचे नव्हे तर विचारांचे वारसदार होणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्रा. मनोहर पटवारी यांनी सांगितले की, “सत्यशोधक लोक सत्ताशोधक बनले असून त्यामुळे क्रांतीकारक चळवळींची तीव्रता कमी झाली आहे.” कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, पर्यवेक्षक प्रा. एस. वी. मूडपे आणि प्रा. बी. एस. भूक्तरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.आर. के. मस्के यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. बी. एस. भूक्तरे यांनी मानले.