होकरणा येथे शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न?

औराद (एल.पी.उगीले)
सीमाभागातील होकरणा येथे शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनीत विनापरवानगी घुसखोरी करून ट्रॅक्टर व जे.सी. बी. च्या सहाय्याने नाली खोदकाम करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित शेतकऱ्यांनी होकरणा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
घटनेत लिंगराज मळगे यांनी सचिन मरपळे यांचे ट्रॅक्टर व लहू थगनरे यांची जे.सी.बी. वापरून, शेजारील शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याच्या उद्देशाने संगनमत करून नाली खोदकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे जमीन मालक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांनी यास विरोध केला असतानाही काम थांबवले गेले नाही.या प्रकरणी नागनाथ कंटाळे, रामबिलास नावंदर, गुरुनाथ कंटाळे, प्रकाश कंटाळे, माधव कंटाळे, विनायक भालके, बालाजी माने व माधवराव माने या शेतकऱ्यांनी होकरणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी संबंधितां विरुद्ध तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींनी कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता परस्पर जमिनीत यंत्रसामग्री घेऊन घुसखोरी केली. ही कृती जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न असून, यामुळे गावात शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू केली असून, लवकरच दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे न्याय मिळवण्यासाठी एकत्र येऊन संघर्षाची भूमिका घेतली आहे.
या घटनेमुळे सीमाभागात जमीन ताब्यासंदर्भात निर्माण होणाऱ्या वादांना नवे वळण मिळाले असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.