तरुणांनी मोबाईल सोडून पुस्तकांशी मैत्री करावी – प्रा. डॉ. सुरेश वाघमारे

लातूर (एल.पी.उगीले): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत संविधान निर्मिती समिती अनुच्छेद, मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्ये या विषयांवर प्रा. डॉ. सुरेश वाघमारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून झाली. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचनही करण्यात आले.
प्रा. डॉ. वाघमारे म्हणाले, “महापुरुष हे सुधारणावादी विचारांचे प्रतिनिधी आहेत. आपला संवाद माणसांशी वाढला पाहिजे. मात्र, आजची पिढी मोबाइलमध्ये व्यस्त आहे. तरुणांनी मोबाइल बाजूला ठेवून पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे.”
या कार्यक्रमाला सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासमवेत श्रीमती के. डी. सुकळकर (गृहप्रमुख), एस. डी. सराफ (लेखाधिकारी), श्रीमती व्ही. आर. चौधरी (गृहपाल) तसेच राजेश सुरकुटलावार (कार्यालय अधीक्षक) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश जाधव यांनी केले, तर आभार श्रीराम शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.