महापुरुषांच्या विचारांवर आधारलेला एकसंघ समाजच राष्ट्राला संपन्नतेकडे नेऊ शकतो – प्रा. डॉ. दत्तहरी होनराव

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताहानिमित्त प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात श्री हावगीस्वामी महाविद्यालय, उदगीर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. दत्तहरी होनराव यांनी “महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि आजचे वास्तव” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रामचंद्र तिरुके होते. यावेळी मंचावर संस्था सदस्य प्रा. मनोहर पटवारी, सामाजिक कार्यकर्ते रंगा राचुरे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, पर्यवेक्षक प्रा. एस. व्ही. मुडपे उपस्थित होते. प्रा. डॉ. होनराव यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, भारतीय राज्यघटना ही शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीमध्ये पात्रता निर्माण करणारी असून ती सर्वसमावेशक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खरे राष्ट्रनिष्ठ विचारवंत होते. “मी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय” ही बाबासाहेबांची भूमिका आज प्रत्येक नागरिकाने अंगीकारण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “आपल्याकडे महापुरुषांच्या विचारांचा समृद्ध वारसा असूनही आजचा समाज जातिव्यवस्थेच्या मर्यादेत अडकलेला आहे. महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन एकसंघ समाज निर्माण झाला तरच भारत संपन्न राष्ट्र बनू शकतो.”
कार्यक्रमाच्या समारोपात सचिव रामचंद्र तिरुके यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांनी मानव कल्याणासाठी आयुष्यभर झटून कार्य केले. भारतीय राज्यघटनेत अनेक लोकहिताच्या बाबींचा समावेश त्यांनी केला आणि विचारांची शिदोरी नागरिकांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. जी. जी. जेवळीकर यांनी तर आभार प्रा. डॉ. बी. एस. भुकतरे यांनी मानले.