उदगीर येथे जागतिक होमिओपॅथीक दिन साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) होमिओपॅथी चिकित्सा शास्त्र-पद्धतीचे जनक डॉ.सॅम्युअल हॅनीमन यांची जयंती आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरी केली जाते.या निमित्ताने होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशन,शाखा-उदगीर च्या वतीने डॉ.मदने हॉस्पिटल व डॉ.कोठारे क्लिनिक,नाईक चौक, देगलूर रोड,उदगीर येथे डॉ.सम्युअल हॅनीमन यांच्या प्रतिमेचे पूजन, अभिवादन तथा होमिओपॅथी चिकित्सा पद्धती व आरोग्यदायी जीवन या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होमिओपॅथी असोसिएशन,उदगीर चे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत कोठारे हे होते. व्यासपीठावर धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज,उदगीरचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील,यु.डी.ए.अध्यक्ष डॉ.गोविंद सोनकांबळे,निमा अध्यक्ष डॉ.राजकुमार घोनसीकर,डॉ.श्रीकांत मध्वरे,डॉ.भिकमचंद सोनी,डॉ.इसा खान परभणीकर हे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील यांनी केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या वतीने होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीच्या प्रचार-प्रसारासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन अत्यंत जुनाट व दुर्धर आजारामध्ये अल्प खर्चात होमिओपॅथी चिकित्साशास्त्राची उपयोगिता विस्तृतपणे सांगितली.
अध्यक्षीय समारोपात डॉ.कोठारे यांनी उदगीर शाखेच्या माध्यमातून होमिओपॅथी व आरोग्यरक्षण या विषयावर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी प्रबोधन शिबीरे राबविण्याचा मानस व्यक्त केला.
या प्रसंगी मान्यवरांची शुभेच्छापर व मार्गदर्शनपर समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अर्जुन चाकूरे यांनी,सूत्रसंचालन डॉ.अली रजा कौसर यांनी व आभार प्रदर्शन डॉ.किशोर बुबणे यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी उदगीर येथील विविध चिकित्सा पद्धतीचे डॉक्टर्स मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.शेख मुदस्सीर, डॉ.कांचन मोरे,डॉ.सुषमा कोंगे,डॉ.सबा खान परभणीकर,डॉ.मजहर ठाणेदार, डॉ.तन्वीर अली रजा मुंजेवार,डॉ सुजाता काळवणे यांनी प्रयत्न केले.