लोकशिक्षक म्हणून डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य मोलाचे – शिवशंकर पाटील

उदगीर (एल.पी.उगीले)
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील म्हणाले, लोक शिक्षक म्हणून डॉ. बाबासाहेबांचे शैक्षणिक कार्य खूप मोलाचे आहे.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील, राजेश हरनुळे, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, विभाग प्रमुख संतोष चामले हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली. प्रमुख पाहुणे शिवशंकर पाटील पूढे बोलताना म्हणाले, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकविणारे, गुलाम म्हणून न जगता स्वाभिमानाने जगायला शिकवणारे , वंचितांचे तारणहार, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दीन दलितांचे कैवारी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ओळखले जाते. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाचन करावे व आपले जीवन समृद्ध करुन घ्यावे.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचाल तर वाचाल हा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन खूप आवश्यक आहे.
विद्यालयातील विद्यार्थी हर्ष निमलवार ,आदित्य वायबसे, शुभम पवार ,आर्यन जाधव, शिवप्रसाद काळे ,रितेश राठोड, सुदर्शन देशमुख, नितेश भालेराव आयुष भुरे , रेवननाथ मनसटवाड यांनी मनोगत व्यक्त केले. आर्यन जाधव प्रथम, शिवप्रसाद काळे द्वितीय व हर्ष निमलवार तृतीय क्रमांक पटकावला असून यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रमुख पाहुणे यांचा परिचय एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी करुन दिला. तर आभार पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रल्हाद येवरीकर, बालाजी कांबळे, विनायक करेवाड, प्रा. नितीन पाटील, उमाकांत नादरगे, विजय कावळे यांनी सहकार्य केले.