आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ.बाबासाहेब यांचे मोठे योगदान-डॉ.श्रीकांत गायकवाड

उदगीर (एल.पी.उगीले) आधुनिक माणूस चंगळवादी,प्रेरणावादी उपभोक्तावादी बनलेला आहे. जगण्याची नैसर्गिकता, सहजता व स्वाभाविकता आज राहिलेली नाही.अशावेळी बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे.कारण आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे. असे उद्गार महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूरचे माजी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड यांनी काढले. छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी.टी.शिंदे, प्रमुख पाहुणे संचालक पुंडलिकराव पाटील, प्राचार्य डॉ.मांजरे आर.एम.,माजी प्राचार्य डॉ.नवले ए.एम.प्रबंधक बालाजी पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सौ.नावंदे यु.टी.यांनी त्रिशरणाचे वाचन केले.
पुढे बोलताना डॉ.गायकवाड म्हणाले, परिघातला समाज आणि परिघा बाहेरचा समाज ही दरी आज पडत आहे. प्रत्येक माणसांची भूमिका स्पष्ट हवी,व्यक्तिगत स्वभावाची मानसिकता आज वाढत आहे, समाजाभिमुख मानसिकता नष्ट होत आहे, जाती व्यवस्था रूढी परंपरा यावर प्रहार करून परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे, असेही ते म्हणाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकिसन मांजरे म्हणाले की , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेवर हल्ला चढवला,धर्म व्यवस्थेवर हल्ला चढवला. सर्व धर्म समभाव समाजाची उभारणी करण्यासाठी प्रयत्न केले.अतिशय मेहनतीने घटना लिहिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंती समिती प्रमुख डॉ.सुरेश शिंदे यांनी, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.व्ही.डी. गायकवाड यांनी तर आभार डॉ.संजय कोनाळे यांनी मानले.