स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला श्रद्धा जगताप पुन्हा सक्रिय, राजकीय वर्तुळात चर्चेला उधान

उदगीर (एल.पी.उगिले)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतील, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना, सामाजिक सेवेमध्ये रममान झालेल्या श्रद्धा संजय जगताप या उदगीर च्या राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्याने राजकारणी मंडळींच्या भुवया उंचावल्या आहेत.
श्रद्धा संजय जगताप अर्थात उदगीरच्या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो, ते प्राचार्य डॉ. कृष्णचंद्र ज्ञाते यांच्या त्या कन्या आहेत. ज्ञाते सर जसे समीक्षक, कवी, लेखक तसेच शास्त्रीय संगीत क्षेत्रातही आपला दबदबा ठेवलेले व्यक्तिमत्व होते. शिक्षण क्षेत्रात श्रद्धा जगताप यांचे आई वडील कार्यरत होते. त्यामुळे इतरांना मदत करणे हा त्यांचा स्थायी स्वभाव बनला आहे. ज्या पद्धतीने कृष्णचंद्र ज्ञाते सर इतरांना मदत करत, त्याच पद्धतीने इतरांना सहकार्य करण्याची भावना श्रद्धा जगताप कायम ठेवतात.जणू आई-वडिलांचा समाजसेवेचा वसाच त्यांनी घेतला आहे. असे म्हटले तर फारसे वावगे होणार नाही.
सुरुवातीला समाजकारण करत समाजातील महिलांच्या संघटनात्मक बांधणीवर श्रद्धा जगताप यांनी मोठे काम केले. बाबा रामदेव यांच्या सानिध्यात आल्यानंतर योग साधना आणि पतंजली योग समितीच्या माध्यमातून संपूर्ण तेलंगणामध्ये त्यांनी आपल्या कामाचा फार मोठा ठसा उमटवला होता.
महिला सबलीकरणाचे अनेक प्रयोग त्यांनी तेलंगणामध्ये केले होते. त्यांच्या या कार्याची दखल सर्वत्र घेतली जात होती. त्याच दरम्यान त्यांनी आपली कर्मभूमी ही उदगीर असावी, असे ठरवून उदगीर परिसरामध्ये येऊन महिलांच्या सर्वांगीण प्रगती सोबतच त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचा पाया मजबूत करण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य शासन आणि केंद्रशासन यांच्या कित्येक योजना आहेत, मात्र दुर्दैवाने त्या योजनांचा लाभ म्हणाव्या त्या गतीने प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळत नाही. ही बाब त्यांनी हेरली, आणि स्वखर्चाने गावोगावी जाऊन महिलांच्या जनजागृती सोबतच महिला सबलीकरणाच्या दृष्टीने त्यांनी शिबिरे घ्यायला सुरुवात केली. महिलांच्या प्रगतीसाठी त्यांनी अशा पद्धतीचे पाऊल उचलले, हे निश्चितच राजकीय वर्तुळातील लोकांना कौतुकास्पद वाटले.
पतंजली योग समितीच्या माध्यमातून काम करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद या भारतीय जनता पक्षाच्या मातृसंस्थांचा त्यांचा संबंध आल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचा निर्णय घेतला. महिला स्वावलंबी झाल्या तर खऱ्या अर्थाने महिलांची आणि समाजाची प्रगती होऊ शकेल, या हेतूने श्रद्धा जगताप यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघातील महिला आणि मुलींसाठी प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू केले.
विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष यांच्या प्रचाराची धुराही श्रद्धा जगताप यांनी समर्थपणे सांभाळली होती. मोठी निवडणूक आली की, कार्यकर्ते नेत्याकडे पैशाची मागणी करत असतात, मात्र श्रद्धा जगताप यांच्या बाबतीमध्ये असे कधीच झाले नाही. त्यांनी स्वखर्चाने आपल्या नेत्याचा प्रचार करून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य कशा पद्धतीने मिळेल, यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचे कार्यकर्ते बोलतात.
मध्यंतरीच्या काळात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन त्या काम करत होत्या. त्यांचे सामाजिक आणि राजकीय काम करण्याचे कौशल्य विचारात घेऊन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त केले होते. एका अर्थाने श्रद्धा जगताप यांच्या कामाची ही पावतीच म्हणावी लागेल. त्यामुळेच राजकारणामध्ये पूर्ण ताकतीने स्वखर्चाने कार्यरत राहत होत्या. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, याची चाहूल लागताच उदगीर परिसराच्या विकासाचा आराखडा आणि उदगीर शहराच्या विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, या विचाराने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन, या परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने महिला आघाडीने केलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती ही त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिली आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये महिलांना सन्मानाने सहभागी करून घ्यावे, अशी आग्रही मागणी ही त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे केल्याचे समजते.
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांनी उदगीर परिसरातील महिलांच्या संघटनात्मक कामाची माहिती दिली आहे. उदगीर विधानसभा मतदार संघांमध्ये विद्यमान आ. संजय बनसोडे यांच्या मार्फत विकासाची कामे चालू आहेतच, त्या कामाला आणखी गती देण्याच्या दृष्टीने काय काय प्रयत्न करता येतील? या संदर्भातही त्यांनी चर्चा केली असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वसंध्येला पुन्हा श्रद्धा जगताप (ज्ञाते) या सक्रिय झालेल्या पाहून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला आघाडी सोबतच कार्यकर्त्यांमध्ये देखील नवचैतन्य निर्माण झाले आहे, असेही कार्यकर्ते बोलत आहेत.
गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे, पक्षाची ध्येयधोरणे आणि महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती लोकांना सांगणे, या विविध योजनेचे खरे लाभार्थी आणि शासन यांच्या मधील दुवा म्हणून कार्यकर्त्यांनी काम करावे. अशी अपेक्षा ठेवून कार्यकर्त्यांची मोठी फळी उभा करण्याच्या दृष्टीने श्रद्धा जगताप सक्रिय होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राजकारणामध्ये सद्यस्थितीत माजी मंत्री तथा विद्यमान आ. संजय बनसोडे यांनी भारतीय जनता पक्ष, महायुती व्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षात सक्रिय कार्यकर्ते फारसे शिल्लक ठेवले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात मोठा ओढा भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाकडे राहणार आहे. तर प्रतिस्पर्धी पक्षांना उमेदवार शोधण्याची वेळ येऊ शकेल, अशी परिस्थिती किमान उदगीर विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा भाजपच्या नेत्या श्रद्धा जगताप पूर्ण ताकतीने मतदार संघात फिरत असल्याचे पाहून इतर राजकीय पक्षातील कार्यकर्ते चलबिचल झाल्याची ही चर्चा आहे.
राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिल्यास, भाजप दुबळा ठरू नये, यासाठी विशेष प्रयत्न वरच्या पातळी वरून चालू असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेश कार्यकारणी मध्ये कार्यरत असलेले कार्यकर्ते देखील गाव पातळीवर, गल्ली पातळीवर जाऊन काम करतील. अशी परिस्थिती पक्षाने निर्माण केली आहे. अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू असल्याने श्रद्धा जगताप यांचे सक्रिय होणे निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.
चौकट…….
विद्यार्थ्या भोवती फिरणारे राजकारण…..
उदगीर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अचानकपणे विश्वजीत अनिल कुमार गायकवाड यांनी विधानसभेची उमेदवारी लढवायचीच, अशी तयारी ठेवून प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी नियोजन केले होते. त्या नियोजनातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्येक घराघरात सहज पोहोचण्यासाठी विद्यार्थी हा महत्त्वाचा समजून प्रत्येक विद्यार्थ्याला वही, पुस्तक, पेन, दप्तर अशा पद्धतीच्या वस्तू भेट देऊन घराघरापर्यंत आणि घरातील प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचता येऊ शकते. हे विश्वजीत गायकवाड यांनी दाखवून दिले होते. तीच पार्श्वभूमी विचारात घेऊन श्रद्धा जगताप देखील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेऊन गाव पातळीवर आणि शाळा पातळीवर काम करणार असल्याचे नियोजन त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.
श्रद्धा जगताप यांनी यापूर्वीही विद्यार्थी केंद्रित भूमिका घेऊन कार्य केले आहे. त्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न त्या करतील की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
चौकट………
अन्नदानाचा नाद…..
श्रद्धा संजय जगताप यांची आणखी एक विशेष बाब म्हणजे, समाजातील तळागाळाच्या लोकापर्यंत सहज पोहोचण्यासाठी कोणत्याही सामाजिक उपक्रमाच्या नंतर अन्नछत्राचे आयोजन निश्चित करतात. अन्नदान करण्याची आवड असल्यामुळे कार्यक्रम झाला की, विद्यार्थ्यांना खाऊ असेल किंवा ग्रामस्थांना महाप्रसाद असेल, त्याचे वाटप करताना श्रद्धा जगताप यांचा पुढाकार ठरलेला असतो. किंबहुना कार्यक्रमासोबतच अन्नदानाच्या कार्यक्रमाची जोड निश्चितपणे लावलेली असते.
चौकट…….
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा अट्टाहास……
उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये इंजिनीयर विश्वजीत अनिल कुमार गायकवाड फाउंडेशनच्या कामाच्या अगोदरच श्रद्धा जगताप यांनी महिला स्वावलंबनासाठी महिलांना शासकीय पातळीवरून शिलाई मशीन वाटप करणे, शिलाई चे प्रशिक्षण देणे. असे कार्यक्रम हाती घेतले होते. त्या कार्यक्रमाला मूर्त रूप देण्याच्या तयारी त्या होत्या, त्या दृष्टीने त्यांनी नियोजनही लावले होते. मात्र मध्यंतरीच्या दरम्यान काही राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे ते कार्यक्रम पुढे ढकलले गेले. आणि नेमके याच काळात इंजिनीयर विश्वजीत अनिल कुमार गायकवाड यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून या कामाला गती दिली. त्यामुळे ते चर्चेत आले. वास्तविक पाहता या मूलभूत कामाकडे श्रद्धा जगताप यांनी अगोदर लक्ष वेधले होते. आता पुन्हा त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण विधानसभा मतदारसंघात सक्रिय होऊन फिरतील की, केवळ उदगीर नगरपालिकेचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून काम करतील? यासंदर्भात तर्क वितर्क लावले जात आहेत. काही असले तरी श्रद्धा जगताप यांच्या सक्रिय होणे भारतीय जनता पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी उत्साह निर्माण करणारे आहे.