आ.संजय बनसोडे यांनी इतिहास निर्माण केला : ना. रामदास आठवले
उदगीर (एल.पी.उगीले): उदगीर मतदार संघाचा भौतिक विकास करण्यासाठी आ. संजय बनसोडे यांनी मागील पाच वर्षाच्या काळात जीवाचे रान करून मतदारसंघाचा कायापालट केला आहे. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले असून त्यातच उदगीर सारख्या ठिकाणी ‘विश्वशांती बुद्ध’ विहाराची निर्मिती केली, व या विहाराच्या लोकार्पण सोहळ्याला महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना बोलावून माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी एक इतिहास निर्माण केला असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील ‘ विश्वशांती बुध्द’ विहारातील सदिच्छा भेट देवून पाहणी करताना बोलत होते.
यावेळी तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, चंद्रकांत चिकटे, देविदास कांबळे, सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, अनिल मुदाळे, ज्ञानेश्वर बिरादार, नरसिंग कदम, शाहबाज शेख, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.रामदास आठवले यांनी, आ.संजय बनसोडे यांनी, उदगीर व जळकोट येथे प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह, मराठा भवन, लिंगायत भवन, बुध्द विहार, शादीखाना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, तिरु नदीवरील बॅरेजेस, महावितरणे कार्यालय, ग्रामीण रूग्णालये, महापुरुषांचे पुतळे, जळकोट व उदगीर शहराला राष्ट्रीय महामार्गाने जोडले, विविध वाडी तांड्यावर योजना पोहचवल्या, वाॅटरग्रीड योजना आणली. भविष्यातील बेरोजगारीचा विचार करुन उदगीर व जळकोटच्या एम.आय.डी.सी. चा प्रश्न मार्गी लावुन येथील बेरोजगार तरूणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा माझा निर्धार त्यांनी केला आहे. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून मतदार संघातील जनतेने त्यांना ९३ हजारापेक्षा जास्त मताधिक्य देवून विजयी केले असल्याचे ना.आठवले यांनी सांगितले.यावेळी पक्षाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
