एसीबी आक्रमक होतेय, बसणार नाही आता थंड !!
लाचखोर काळेला तीन वर्षाची शिक्षा व 5 हजाराचा दंड!!
लातूर (ऍड. एल.पी.उगीले)
मध्यंतरीच्या काळात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणाऱ्या अनेक कारवाईच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या कारणाने, लाचखोर सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त होत होते, परिणामतः लाचेचे प्रमाण वाढले होते. लातूर जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला संतोष बर्गे हे पोलीस उपाधीक्षक म्हणून रुजू झाल्यापासून लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला कसल्याही पद्धतीची सवलत मिळणार नाही, किंवा कायद्यातून पळवाट काढण्यासाठी, साक्षीदार फोडण्यासाठी हालचाल करण्याची संधीच द्यायची नाही. असे कठोर धोरण स्वीकारले आहे. हे सर्व करण्यासाठी कित्येक वेळा लोकसेवक आरोपी असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यासाठी त्यांनी पत्रव्यवहारही संबंधित खात्याला करून तो कर्मचारी किंवा अधिकारी आपल्या विभागातील कोणत्याही पुराव्याशी छेडछाड करू शकणार नाही, याची दक्षता बारकाईने घेतली आहे. कदाचित यामुळेही असेल सध्या लाचखोर प्रवृत्तीला लगाम घालण्या साठी कठोर शिक्षा दिली जाऊ लागली आहे.
लाचखोरी हा समाज व्यवस्थेला लागलेला कलंक आहे. तो कलंक पुसून काढण्यासाठीच लाच लुचपत प्रतिबंधक विभाग स्वतंत्रपणे काम करत आहे. असे असले तरीही अल्पशिक्षित, अशिक्षित लोक किंवा शेतकरी, कष्टकरी आपले काम लवकर व्हावे म्हणून अपेक्षेपोटी पैसे देतात, जणू काही पैसे दिल्याशिवाय आपले काम होणार नाही. अशा पद्धतीची भीती त्यांच्या मनामध्ये कायम नोंदवलेली असावी. त्यामुळे लाचखोरी वाढत चालली आहे. वास्तविक पाहता लाच देणे आणि घेणे दोन्ही गुन्हा आहे. त्यामुळे समाजातील सर्व नागरिकांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन लाचखोर प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आपल्या परिसरातील कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्रयस्थ इसम, दलाल, एजंट जर शासकीय काम करून देण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्काव्यतिरिक्त पैसे मागत असेल तर तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयामध्ये संपर्क करावा. जेणेकरून वेळीच लाचखोरीला आळा घातला जाईल. शिवाय तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहनही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाच्या वतीने पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे यांनी केले आहे.
लातूर जिल्ह्यातील सह निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय लातूर वर्ग 3 यांच्या कार्यालयात विष्णू तुळशीदास काळे (वय 34 वर्ष, पद कनिष्ठ लिपिक नेमणूक दुय्यम निबंधक कार्यालय कळंब संलग्न सहन जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय लातूर) यांनी 5 जानेवारी 2017 रोजी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे तक्रारदार यांनी अहमदपूर येथील एमआयडीसी कडून भाडेपट्टी करण्यासाठी आवश्यक असलेला मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या कार्यालयात 13 डिसेंबर 2016 रोजी सदरील दस्त अभिनयासाठी दाखल केला होता. त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी भरून दस्त घेऊन तो एमआयडीसी कार्यालय लातूर येथे सादर करावयाचा होता. नमूद कामासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी चलनाद्वारे भरली होती, भरण्यात आलेली पावती जमा करून घेऊन दस्त देण्याचे कामासाठी आरोपी लोकसेवक विष्णू तुळशीदास काळे यांनी तक्रारदार यांना एक हजार रुपये लाचेची मागणी केली, आणि शासकीय पंचाच्या समक्ष सदरील लाचेची रक्कम स्वीकारली. यामुळे त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर येथे कलम 7,13(1)(ड) सह 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्यांतील आरोपी विरुद्ध तत्कालीन पोलीस निरीक्षक औदुंबर मोरे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांनी तपास पूर्ण करून जिल्हा व सत्र न्यायालय लातूर क्रमांक एक यांच्या कोर्टात आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सदरील खटल्यात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक एक आर. बी.रोटे यांनी आरोपी लोकसेवकाविरुद्ध सदर लाचे चा गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी लोकसेवक विष्णू तुलसीदास काळे यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7,13(1) (ड) स 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये तीन वर्षे शिक्षा व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सदरील खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता विठ्ठल देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना त्यांचे सहाय्यक विधीज्ञ परमेश्वर तल्लेवाड यांनी सहकार्य केले.
लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये आरोपीला शिक्षा झाल्यामुळे अशा प्रवृत्तीला आळा बसेल, अशी अपेक्षा समाजा मधून व्यक्त केली जात आहे.
लातूर जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष खटला क्रमांक 6/ 2017 शासनविरुद्ध विष्णू काळे यामध्ये पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्र नांदेडचे संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरण पर्यवेक्षण अधिकारी लाचलचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे, कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर, कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस हवालदार भागवत कठारे, असलम सय्यद, फारूक दामटे, भीमराव अलुरे यांनी सदर खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांच्याशी योग्य समन्वय ठेवून व खटल्यातील तपास अधिकारी, फिर्यादी व साक्षीदार यांची साक्ष होण्यासाठी खटल्या दरम्यान मदत केली आहे. म्हणून त्यांचेही कौतुक केले जात आहे.
