अव्होपाच्या वतीने संवाद सोहळास्पेनच्या पर्यटकांना भारतीय भूमीची भुरळ.

उदगीर (एल.पी.उगीले)
भारत दौऱ्यावर आलेल्या स्पेन देशातील पाहुण्यांना उदगीरकरांचा मराठमोळा पाहुणचार भावला. अव्होपाच्या वतीने आयोजित संवाद सोहळ्यात त्यांनी संवाद साधत येथील वैशिष्ट्यांचे कौतुक केले.
स्पेन देशातील फेडरिको जिमनेझ व मारिया जोसेफा यांना भारतीय संस्कृती व येथील वैविध्याच्या उत्सुकतेतून भारत दर्शन निमित्य उदगीरला आले. उदगीर येथील अव्होपाच्या वतीने आयोजित संवाद सोहळ्यात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील एलिफंटा, वेरूळ, अजंठा, लोणार सरोवर, नांदेडचा गुरुद्वारा पहात त्यांनी उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्याला भेट दिली. या ऐतिहासिक किल्ल्याचा इतिहास जाणून घेताना मारिया आणि फेडरिको यांनी हा किल्ला मनापासून आवडला असे सांगितले. आव्होपाच्या वतीने आयोजित संवाद सोहळ्यात भारतीयांचे असणारे घट्ट नातेसंबंध, कुटुंब व्यवस्था याबद्दल असणारा आदर व्यक्त केला. विशेष म्हणजे त्यांना भारतीय देवदेवतांची नावे माहीत असून ज्येष्ठांचे चरण स्पर्शही केले. अव्होपाच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यात साहित्यिक धनंजय गुडसूरकर, अव्होपाचे अध्यक्ष प्रा. संजय चन्नावार, राजाराम चव्हाण गुरुजी यांच्या हस्ते त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. अव्होपाच्या सामाजिक योगदाना विषयी गौरवोद्गार काढत सामाजिकते चा येथील वारसा दिशादर्शक असल्याचे ते म्हणाले. ग्रंथपाल प्रा.डॉ.लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी स्पॅनिश भाषेतून त्यांना अव्होपाच्या कार्याविषयी अवगत केले. या संवादात बाळासाहेब बिरादार यांनी दुभाषी म्हणून काम पाहत या परिसराच्या संस्कृतीचा परिचय या परदेशी पर्यटकांना करून दिला. डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी सूत्रसंचालन तर बालाजी बुन्नावार यांनी आभार मानले. अव्होपा सदस्य व नागरिक यावेळी उपस्थित होते.
तालुक्यातील हिप्परगा (डा.) या गावात व शेतशिवारात भेट देऊन त्यांनी ग्रामसंस्कृती आणि कृषी संस्कृतीची माहिती घेतली. भुईमुगांच्या शेंगांना पाणी देण्याचा व शेतात कांदे काढणाऱ्या महिलांसोबत कांदे काढण्याचा अनुभवही त्यांनी तळतळत्या उन्हात घेतला. चौत्राबाई चव्हाण, सोलरबाई चव्हाण, दत्ता चव्हाण ,योगिता चव्हाण, प्रांजली बिरादार, गणेश कानूरे, पोलीस पाटील अण्णाराव पाटील यांच्याशी त्यांनी संवाद साधला.