करणी धरणी व जादूटोणाची भीती दाखवून लुबाडलेल्या घरी अनिस पदाधिकाऱ्यांची भेट

उदगीर (एल.पी.उगीले) कासीमपुरा जळकोट रोड येथील फिर्यादी अस्मतुन्नीसा जबारोद्दीन परकोटे यांना वेळोवेळी जादूटोण्याची भीति दाखवून आरोपीनी 33 लाख 90000 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली असल्याची बातमी वर्तमानपात्रात वाचल्यानंतर उदगीर येथील अनिस च्या कार्यकर्त्यांनी याची दखल घेऊन जबरोद्दीन परकोटे यांना संपर्क करून त्यांची व कुटुंबियांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. महाराष्ट्र अनिस उदगीर शाखेचे कार्याध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील, उपाध्यक्ष विश्वनाथ मुडपे गुरुजी व बाबूराव माशाळकर,प्रधान सचिव प्रा. बळीराम भुक्तरे, शिरीष रोडगे तसेच रोटी कपडा बँकेचे खुर्शीद सिद्दीकी यांनी परकोटे यांच्या घरातील सर्वं व्यक्तींना संवाद साधून घटनेची इत्यंभूत माहिती घेतली. घरातील व्यक्तींना अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा( महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश 2013 अनुसूची ) याची सविस्तर माहिती दिली, व त्यांना धीर दिला.फिर्यादीने एफआयआर ची प्रत दिली. त्याची माहिती महाराष्ट्र अनिस चे कार्याध्यक्ष माधव बावगे लातूर यांना देऊन दूरध्वनी वरून चर्चा केली व पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.