मध्यरात्री दोन वाजता अवैध दारूवर धाड !!

0
मध्यरात्री दोन वाजता अवैध दारूवर धाड !!

लाखोंच्या दारूसह दोन आरोपी गजाआड !!

लातूर (एल पी उगीले)बाहेर राज्यातून बनावट किंवा कमी प्रतीची दारू महाराष्ट्रात आणून, वेगवेगळ्या कंपनीच्या बाटल्यामध्ये ती दारू भरून व्यवस्थित सील करून धाब्यावरून त्या दारूची विक्री सर्रास करण्याचा प्रकार सध्या चालू आहे. या अनुषंगाने सगळीकडे ओरड सुरू झाली आहे. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशान्वये तसेच नांदेड विभागाचे विभागीय उपायुक्त बी एच तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांच्या व उपाध्यक्ष एम.जी. मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेषणाच्या मोहिमेच्या अनुषंगाने 23 एप्रिल रोजी रात्री दोन वाजता लातूर जिल्ह्यात गोवा राज्य निर्मित अवैध मद्य वाहतूक विरोधात चाकूर विभाग यांनी गुणात्मक गुन्हा नोंद करून दुचाकी वाहनावर कारवाई केली आहे. यामध्ये आरोपी समाधान ज्ञानोबा डावळे (वय 30 वर्ष रा रेनापुर) आणि शंकर बालाजी गालफाड (वय 27 वर्ष रा पानगाव तालुका रेनापुर जिल्हा लातूर) या दोन आरोपींना अटक केली आहे.
सदर गुन्ह्यामध्ये 180 मिली क्षमतेच्या गोवा राज्य निर्मित रॉयल स्टॅगच्या 2304 बाटल्या,(48 खपटी खोके), तसेच 180 मिली क्षमतेच्या गोवा राज्य निर्मिती इम्पेरियल ब्लू कंपनीच्या 625 बाटल्या (13 खपटी खोके), 180 मिली क्षमतेच्या गोवा राज्य निर्मित मॅकडॉल नंबर वन च्या ७२० बाटल्या (15 कट्टी खोके) अशा 180 मिलीच्या 3649 गोवा राज्य निर्मित विदेशी दारूच्या बाटल्या तसेच 500बुचे, 1000 लेबल व होंडा शाईन कंपनीच्या दोन मोटार सायकल (एम एच 13 सीएफ 77 39 आणि एम एच24 ए व्हि14 67) या दोन दुचाकी वाहनासह आठ लाख सहा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग चाकूरच्या निरीक्षक श्रीमती उषाकिरण मिसाळ, दुय्यम निरीक्षक एस आर राठोड, एस के वाघमारे, एन डी कचरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिरुद्ध देशपांडे, भरत गायकवाड, बळी साखरे, ऋषी चिंचोलकर, हनुमंत माने या पथकाने ही मोठी कामगिरी करून दाखवली आहे.
गंमत म्हणजे अनेक धाब्यावरून पोलीस प्रशासनातील झारीतल्या शुक्राचार्यांना हाताशी धरून बिनधास्तपणे अवैध दारू विकली जाते. कित्येक वेळा परमिट रूम आणि बियर बार यांच्यापेक्षा कमी दरामध्ये या बनावट किंवा परराज्यातून आयात केलेल्या दारूची विक्री केली जाते. सर्वसामान्य तळीराम बाटली वरचे लेबल पाहून बिनधास्तपणे ती बाटली खरेदी करतो, आणि या अवैध धंदेवाल्याच्या चक्रव्यूह मध्ये अडकतो. त्याला बनावट किंवा परराज्यात बनवलेली दारू आणि मूळ दारू यातला फरक लक्षात येत नसल्याने, तळीराम बिंनधास्त पणे त्या दारूवर ताव मारतात. मात्र कित्येक वेळा ही बनावट दारू त्याच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मात्र केवळ पैशासाठी धंदा म्हणून धाबे वाले अशा दारूची विक्री करण्यामध्ये मशगुल झालेले आहेत. हे विचारात घेऊन चाकूर विभाग राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक उषाकिरण मिसाळ यांनी आपल्या पथकासह अवैध मार्गाने दारू विक्री करणारे तसेच वाहतूक करणारे आणि अवैध धंदे करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
त्यांच्या या आक्रमक कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. वरिष्ठांचा आदेश धाब्यावर ठेवून धाब्यावरच अवैध दारू विक्री करणारे महाभाग आता उघडे पडू लागले आहेत. अशा अवैध दारू विक्रेत्यावर आणि दारू पुरवठा करणाऱ्यावर विशेष कलमान्वये कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याचा इशारा चाकूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक श्रीमती उषाकिरण मिसाळ यांनी दिला असून अशा पद्धतीची मोहीम यापुढेही चालूच राहणार असल्याचे कळवले आहे.
अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व अवैध दारू वाहतूक विरोधात कारवाई कठोर केली जाणार असून तसेच धाब्यावर बसून मद्य सेवन करीत असलेल्या व्यक्तीवर, अवैध दारू पुरवठा करणाऱ्या धाबामालकावर देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी अवैध मद्या बाबत माहिती असल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला सूचना द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल. असे राज्य उत्पादन शुल्क विभाग लातूरचे अधीक्षक केशव राऊत यांनी कळवले आहे.
चाकूर विभागाच्या वतीने केलेली ही मोठी कारवाई इतर अनेक विभागासाठी आदर्श असून अशा पद्धतीच्या कारवाईसाठी जिल्ह्यातील इतर विभाग देखील पुढे सरसावतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना वाटू लागली आहे. एक महिला असून देखील उषाकिरण मिसाळ यांनी आपल्या पथकासह मोठी कामगिरी करून आपले वेगळेपण दाखवून दिले आहे.
त्यांनी ठरवलेले आणि अवैधधंद्याच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याची जाहीर केलेली भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. काही वेळेस गाव पुढारी किंवा लोकप्रतिनिधी आपल्या चेल्या-चपाट्याला धंद्याला लावून देण्यासाठी अशा अवैध धंद्याच्या सूचना करत असतात, आणि मग एखादा कठोर अधिकारी कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून कारवाई करत असेल तर त्याच्या विरोधात ओरड करण्यात असे लुटुपुटू चे पुढारी मागेपुढे पाहत नाहीत. या सर्व गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने काम करणे गरजेचे आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!