पहलगाम येथील दहशतवादी कृत्याविरुद्ध अभाविप च्या वतीने निषेध आंदोलन

उदगीर : ( एल पी उगिले) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उदगीर शाखेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे धर्म विचारून निर्दोष नागरिकांना व पर्यटकांना गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेचा आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. या अमानुष कृत्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र निषेध केला. या घटनेमुळे देशातील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. केवळ धर्म विचारून निष्पाप लोकांचे प्राण घेणे, हे दहशतवादाचे आणि कट्टरवादाचे अत्यंत निंदनीय स्वरूप आहे.या आंदोलनात पाकिस्तान मधून आलेल्या दहशतवाद्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी भावना जिल्हाप्रमुख प्रा. डॉ. किरण गुट्टे यांनी व्यक्त केली. उदगीर शहर मंत्री आदित्य पाटील यांनी सुद्धा या दहशतवादी कृत्याचा निषेध केला. यावेळी उदगीर शहराध्यक्ष प्रा. डॉ. गौरव जवळेकर यांनी शासनाने या अतिरेक्यांना पकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे मत व्यक्त केले. या आंदोलनात विद्यार्थी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सुषमा स्वामी, पल्लवी जडितकर, प्रियंका बिरादार, ओम वट्टमवार , कृष्णा पवार , पृथ्वीराज बिरादार यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.