अवैध सावकारी विरोधात 26 एप्रिल रोजी तक्रार निवारण दिन

लातूर (एल.पी.उगिले) वेळेवर आर्थिक मदत मिळत नसल्यास अनेकजन इच्छा नसताना किंवा अज्ञानपणाने खाजगी सावकाराकडून चक्रवाढ व्याज दराने पैसे घेवून सावकारीच्या विळख्यात फसतात, मग सावकाराच्या वसुलीचा सामनाही करावा लागतो. यातुनच मग सावकारा कडून कर्ज वसुल करताना विनयभंग, सावकाराला घाबरून आत्महत्या, चरितार्थाचे साधन सावकाराकडून घेवून जाणे, सावकाराकडून घेतलेल्या पैशातुन जुगार, व्यसनातून नैराश्याच्या गर्तेत अडकणे असे प्रकार घडतात. परंतु सर्वसामान्य माणुस कर्जाच्या डोंगराखाली दबून जातो. यासाठी अवैध सावकारीमुळे पिडीत लातूर शहरातील नागरीकांसाठी लातूर पोलीस दलाच्या वतीने दि.19 एप्रिल रोजी विवेकानंद चौक पोलीस स्टेशन, लातूर याठिकाणी तक्रार निवारण दिन ठेवण्यात आलेला होता. सदर दिवशी अवैध सावकारी विरुद्ध एकूण 9 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारीवर कार्यवाही सुरू आहे.
अवैध सावकारीची व्याप्ती पाहता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये पुन्हा दिनांक 26 एप्रिल शनिवारी रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, (लातूर शहर) गांधी चौक येथे अवैध सावकारी विरोधी तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी आपण खाजगी सावकारीमुळे पिडीत असाल तर आपल्या तक्रारी सह निसंकोचपणे पोलीस ठाणे गांधी चौकच्या आवारातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उपस्थित राहावे, असे अवाहन करण्यात येत आहे.
प्राप्त तक्रारीवर वरिष्ठांचे मार्गदर्शनात तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे.