ग्रंथ प्रेमी सन्मान पुरस्काराचे मानकरी डॉ. वर्षा वैद्य,दिगंबर गायकवाड, सुरज चौधरी यांचा सन्मान.

उदगीर (एल. पी.उगिले)
“शिक्षित असणाऱी माणसे अधिक वाचतात हा गैरसमज असून याच मंडळींचे वाचनाकडचे दुर्लक्ष हा चिंतेचा विषय आहे, वाचन परंपरेला समृद्ध करणारी ग्रंथप्रेमी चळवळ समाजातील वाचनाला समृद्ध करते आहे “असे प्रतिपादन बसवराज पाटील यांनी केले. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ग्रंथप्रेमी वाचक सन्मान पुरस्कार सोहळ्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहयोग बँकेचे चेअरमन रमेश अंबरखाने, विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य प्राध्यापक डॉ. नर्सिंग कदम, ग्रंथमित्र दीपक बलसुरकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रामप्रसाद लखोटिया उपस्थित होते.
प्रारंभी या उपक्रमाचे संयोजक धनंजय गुडसूरकर यांनी ग्रंथप्रेमी चळवळ व या उपक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. संयोजिका अनिता येलमटे यांनी ग्रंथप्रेमी पुरस्काराबद्दल माहिती तसेच सत्कारमूर्तींचा परिचय दिला. यावेळी डॉ. वर्षा वैद्य, दिगंबर गायकवाड, सुरज चौधरी यांना व अंबिका ढोबळे, कु. अविका मुंदडा या विद्यार्थ्यांना २०२५ चा ग्रंथप्रेमी वाचक सन्मान देऊन गौरव करण्यात आला.
वाचन करण्यासाठी वाचनाचे महत्त्व लक्षात घेणे गरजेचे आहे, यासाठी लागणारी प्रेरणा ही अनुकरणातून मिळत असते. शिक्षक, प्राध्यापकच वाचतात हा गैरसमज असून आज सन्मानित होणाऱ्या वाचकांकडे पाहिले की वाचन करणारी मंडळी विविध क्षेत्रात आहेत, हे सिद्ध होते. असे मत बसवराज पाटील यांनी पुढे बोलताना व्यक्त केले. साहित्य पूरक चळवळी या नेहमी समाजपयोगी राहिलेले असून वाचकांचा गौरव ही अभिनव संकल्पना असल्याचे ते म्हणाले.
सहयोग बँकेचे चेअरमन रमेश अंबरखाने यांनी उदगीर मधील वाचन चळवळीचा आढावा घेत येथे वाचकांची मोठी संख्या आहे. या सन्मानाच्या माध्यमातून वाचणाऱ्यांचा होणारा गौरव या वाचन चळवळीला पुढे नेईल, असा विश्वास अंबरखाने यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. सत्कारमूर्तींच्या वतीने डॉ. वर्षा वैद्य, दिगंबर गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. बालाजी मुस्कावाड यांनी सूत्रसंचालन तर डॉ. प्रवीण मुंदडा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वास पडिले, प्रा. डॉ. स्मिता लखोटिया, तृप्ती मुंदडा, विश्वनाथ मूडपे आदींनी पुढाकार घेतला.