वाचनामुळे मानसिकदृष्ट्या देखील माणूस समृद्ध होतो – श्रीमती अर्चना मिरजकर

0
वाचनामुळे मानसिकदृष्ट्या देखील माणूस समृद्ध होतो - श्रीमती अर्चना मिरजकर

उदगीर (एल. पी.उगिले)
वाचन एक प्रकारे मेंदूचा व्यायाम असतो. वाचनामुळे ताण व चिंता दूर होऊन मन स्थिर बनते. नियमित वाचन केल्यास मनाची एकाग्रता वाढते. वाचनामुळे शब्दसंग्रह देखील वाढतो. वाचनसंस्कृती रुजत गेल्यास बौद्धिकते बरोबर माणूस मानसिकदृष्ट्या देखील अतिशय समृद्ध होतो. असे विचार लेखिका श्रीमती अर्चना मिरजकर, नवी दिल्ली यांनी व्यक्त केले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील ग्रंथालय व मराठी विभागाच्यावतीने जागतिक पुस्तक दिनानिमित्त “ग्रंथ माझा सखा” या विषयावर आभासी स्वरूपात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.जी. एमेकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लेखिका, युट्युब होस्ट व कॅनडाच्या दूतावासात वरिष्ठ माहिती आणि जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती अर्चना मिरजकर या उपस्थित होत्या.याशिवाय बालशिवाजी सार्वजनिक वाचनालय होणाळी‌ येथील अध्यक्ष शिवाजी बिरादार व उपप्राचार्य डॉ.ए.ए. काळगापुरे यांची उपस्थिती होती. सुरुवातीला प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रमुख डॉ.सुशीलप्रकाश चिमोरे तर पाहुण्यांचा परिचय इंग्रजी विभागातील प्रा.मनोहर भालके यांनी करून दिले. पुढे बोलताना श्रीमती अर्चना मिरजकर म्हणाल्या,आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक जण स्क्रीनवर वाचन करत आहेत, परंतु ते आरोग्यासाठी घातक आहे. पुस्तक वाचण्याचा आनंद खूप वेगळा असतो. मन:शांती व मनोरंजन यासाठी देखील वाचन नितांत गरजेचे आहे. वाचनामुळे माणूस बहुश्रुत होतो. ग्रंथ एका अर्थाने आपल्याला स्फूर्ती, प्रेरणा देतात. आपला आत्मविश्वास वाढवतात. इतकेच नव्हे, तर वाचन ही सहनिर्मिती देखील असते. असे सांगत त्यांनी आपल्या लेखन व वाचनाची जडणघडण कशी झाली? यावर विस्ताराने भाष्य केले.
यावेळी शिवाजी बिरादार व उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर म्हणाले, आज माणूस जीवनातला आनंद व समाधान हरवत बसलेला आहे. अशा काळात माणसाला ग्रंथच तारू शकतात. वाचनसंस्कृती ही एक चळवळ म्हणून पुढे यायला हवी.
सदरील कार्यक्रमास दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य,अभ्यास मंडळाचे सदस्य, ग्रंथपाल, प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी गुगल मीटवर शंभरपेक्षा अधिक संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार बोयणे व विभागातील प्राध्यापकांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन डॉ.म.ई.तंगावार तर आभार ग्रंथपाल प्रा.अजित रंगदळ यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!