देवर्जन तलाठी सज्जा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर तालुक्यातील
महसूल मंडळ विभाग देवर्जन अंतर्गत तलाठी सज्जा दावणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार राम बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवर्जन मंडळ विभागामध्ये दावणगाव येथे समाधान शिबिराचे आयोजन करून या शिबिरामध्ये नायब तहसीलदार विलास सोनवणे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उत्पन्नाचे प्रमाणपत्र, सातबारा, शिधा पत्रिका यांचे वाटप करून सध्या महाराष्ट्र शासनाकडून चालू असलेल्या नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी विविध योजना बाबत माहिती देण्यात आली. नायब तहसीलदार विलास सोनवणे पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले की, जिवंत सातबारा याबाबत मयत शेतकरी खातेदाराच्या वारसांनी सातबारा मध्ये मयताचे ठिकाणी वारसाची नोंद करून घेऊन आपल्या सातबारा शासनाच्या धोरणानुसार जिवंत सातबारा कराव्यात, म्हणजेच या सातबारा मध्ये वारसाची नोंद झाल्यामुळे आपली शासकीय कामे तसेच शासकीय योजनांचा लाभ याचबरोबर बँकेची कर्ज अशा विविध प्रकारचा लाभ त्यावर वारसांना होऊन ते कुटुंब आर्थिक विवंचनेपासून दूर राहील, व त्या कुटुंबाची आर्थिक सबलता चांगल्या प्रकारे होईल. या साठी आपल्या व्यक्तीच्या ठिकाणी वारसाची नोंद करून आपला सातबारा अद्यावत करून घ्यावा.फार्मर आयडी बाबत पुढे सांगताना ते म्हणाले की, केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजना याचा लाभ शेतकरी कुटुंबीयास होईल, जसे की पी. एम. किसान योजना व विविध कृषी योजनांचा लाभ शेतकरी कुटुंबास होईल. यासाठी आपण फार्मर आयडी हे कार्ड काढून घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगण्यात आले.
शिधापत्रिकांचे ई के वाय सी करणे याबाबत शिधापत्रिका धारक व त्यांचे सदस्य यांच्याबाबत सविस्तर अशी माहिती शासनास ई केवायसी केल्यामुळे मिळणार आहे. व त्यानुसार ते कुटुंब कोणत्या योजनेस पात्र आहे. व अपात्र आहे. याबाबतचे धोरण निश्चित करण्यासाठी व गरीब कुटुंबांना याचा लाभ मिळण्यासाठी प्राधान्याने आपण ई केवायसी करून घेणे बंधनकारक आहे. असे यावेळी सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी दिलीप हिप्परकर, सरपंच ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच नारायण कांबळे,चेअरमन विश्वनाथ भंडे, शिवाजीराव भोळे, बब्रुवान भंडे, ग्रामरोजगार सेवक प्रेमदास भंडे, ग्रामपंचायत ऑपरेटर संदीप पाटील, ग्रामपंचायत लिपिक शेषराव भोळे, देवर्जन मंडळातील नागरिक,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व देवर्जन मंडळातील ग्राम महसूल अधिकारी राहुल आचमे, सचिन बिरादार, सुषमा भंडारे, अंकुश वडगावे,दत्तात्रय मोरे हे उपस्थित होते.