उष्णतेपासून बचावासाठी काळजी घ्या – डॉ. शरदकुमार तेलगाने

उदगीर (एल.पी.उगीले) सध्या झपाट्याने तापमान वाढत आहे. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. अशा उष्णतेच्या लाटेत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. असे आवाहन सुप्रसिद्ध डॉक्टर तथा समाज प्रबोधनात्मक कीर्तनकार डॉ. शरद कुमार तेलगाणे यांनी केले आहे.
उन्हाळ्याची तीव्रता अचानक वाढत चालली आहे. अशा काळात शरीरातील पाणी कमी होऊ शकते, त्यामुळे नेहमी भरपूर पाणी प्या. विशेषत: उपलब्ध असेल तेव्हा ताक, लिंबू पाणी आणि शरबत यासारख्या शीतपेयाचे सेवन करा. उन्हात बाहेर पडत असताना डोक्यावर टोपी घाला. डोळ्याचे रक्षण करण्यासाठी गॉगल वापरा, अंगात हलक्या रंगाचे सुती कपडे परिधान करा. शक्यतो कडक उन्हाच्या काळात श्रमाची कामे करणे टाळा. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी तीव्र उष्णतेची लाट असताना विशेष काळजी घ्यावी. शरीरामध्ये अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे किंवा ताप येणे अशी लक्षणे दिसून येत असतील तर दुर्लक्ष न करता त्वरित आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या. असेही आवाहन डॉ. शरद तेलगाने यांनी केले आहे.
श्रमाची कामे करणाऱ्यांनी शक्यतो भर दुपारी विश्रांती घ्यावी. अत्यंत तातडीचे काम असल्याशिवाय इतरांनी घराबाहेर पडू नये. कडक उन्हातून आल्याबरोबर अति शीत पाणी पिऊ नये. उष्माघात टाळावा, यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी. असेही डॉ. शरद तेलगाने यांनी आवाहन केले आहे.