ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने राज्यव्यापी काम बंद आंदोलन : ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प

उदगीरव(एल पी उगिले):- महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या आवाहनानुसार १ व २ मे २०२५ रोजी राज्यभरात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारले. या आंदोलनाला लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून, ग्रामपंचायत कर्मचारी पंचायत समितीच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन करत आहेत.या आंदोलनाचे मुख्य आयोजन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना, शाखा उदगीर यांच्या वतीने करण्यात आले असून, राज्य शासनाकडून प्रलंबित असलेल्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करावी.,निवृत्ती वेतन योजना त्वरित लागू करावी.,उपदान व ग्रॅज्युटी लागू करावी.,भविष्य निर्वाह निधी, कामगार भविष्य निर्वाह निधी संघटना कार्यालयात जमा केला जावा., सुधारित वेतन त्वरित लागू करावे.,
वसुली उत्पन्नाची जाचक अटी कमी करून पारदर्शक व न्याय्य प्रणाली तयार करावी. अशा आहेत.
कर्मचाऱ्यांनी आंदोलनादरम्यान शासनाविरुद्ध घोषणाबाजी केली आणि आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागल्याबद्दल खंत व्यक्त केली. “आम्ही गावपातळीवर प्रशासनाचा कणा आहोत, परंतु आमचेच अधिकार डावलले जात आहेत,” असे मत आंदोलकांनी व्यक्त केले.या आंदोलनाचा परिणाम म्हणून तालुक्यातील ग्रामपंचायतींचा सर्व कारभार ठप्प झाला आहे. गावगाडा थांबल्याने नागरी सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता व इतर दैनंदिन सेवा प्रभावित झाल्या आहेत. ग्रामपंचायत कामगार सेनेचे नेते सांगतात की, जर शासनाने लवकरच मागण्यांकडे सकारात्मक दखल घेतली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. “गावाचा कारभार ठप्प करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही,” असे ठाम मत त्यांनी मांडले.संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली एकजूट व संघटित आंदोलनामुळे शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, येत्या काही दिवसांत सरकार कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.