लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित स्नेहमेळावा संपन्न

लातूर (एल पी उगिले)
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी आमदार धीरज देशमुख यांनी उपस्थित राहून जिल्हा बँकेचे आजी-माजी अधिकारी, कर्मचारी आणि गटसचिव आदींच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जिल्हा बँकेच्या स्थापनेपासून ते आजच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्वांच्या कार्याला याप्रसंगी उजाळा दिला.
राज्याचे माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा बँक वाटचाल करत आहे. आपल्या हक्काची लातूर जिल्हा बँक नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, जिल्हा बँकेने नेहमीच शेतकऱ्यांचा कणा मजबूत करण्याचे कार्य केले आहे. शेतकरी ताठ मानेने चालला पाहिजे, याच विचारातून बँकेचा प्रवास आजही सुरू असल्याचे मत धीरज देशमुख यांनी व्यक्त केले.
लातूर जिल्हा बँक ही आज राज्याच्या अग्रगण्य बँकांपैकी एक आहे. या यशात बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि गटसचिव या सर्वांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कमी मनुष्यबळ असूनही, बँक आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा पुरवते आणि पारदर्शक कारभार करते. बँकेने स्वनिधीतून अनेक कल्याणकारी योजना यशस्वीरित्या राबविल्या आहेत, याबद्दल सर्वांचे कौतुक करून आभार व्यक्त केले आणि आपल्या हक्काच्या जिल्हा बँकेच्या आगामी वाटचालीतही आपल्या सर्वांचा मोलाचा सहभाग असेल, असा आशावाद यावेळी चेअरमन धीरे देशमुख यांनी व्यक्त केला.