“चला मैत्री करूया पुस्तकांशी” या उपक्रमाचे आयोजन.

उदगीर (प्रतिनिधी) येथील कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात दि. 6 मे पासून ” मैत्री करू या पुस्तकांशी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयातील ग्रंथालयात विविध उपक्रम साजरे केले जात असून, आता विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या चालू झालेल्या आहेत, विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी तसेच तिचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने दि. 6 मे ते दि. 10 जून 2025 या कालावधीत उदगीर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी “मैत्री करू या पुस्तकांशी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे आयोजन कै. बापूसाहेब एकंबेकर सेवाभावी संस्थेच्या कोषाध्यक्ष सौ.मृदुलाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असल्याची माहिती ग्रंथपाल डॉ. हिरा मोरतळे यांनी दिली. या सुट्ट्यांच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी वाचन वाढवून मोबाईलच्या सवयीपासून परावृत्त होणे गरजेचे असून, त्यासाठी पुस्तकांची मैत्री करणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच कथा, कादंबऱ्या,वर्तमानपत्र आत्मचरित्र, नाटक, चरित्र प्रवास वर्णन, वैचारिक पुस्तके, ऐतिहासिक तसेच पौराणिक ग्रंथ, स्पर्धा परीक्षांचे पुस्तके यासह शब्दकोश, विश्वकोश, इतर वाचन साहित्य वाचन करण्यासाठी दिनांक 6 मे ते 10 जून 2025 या कालावधीत सकाळी 11 ते 2 या वेळेत (रविवार व सुट्टीचे दिवस वगळता) महाविद्यालयाचे ग्रंथालय मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे ओळखपत्र सादर करणे बंधनकारक आहे. या उपक्रमाचा लाभ उदगीर व परिसरातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ओमप्रकाश क्षीरसागर व ग्रंथपाल डॉ. हिरा मोरतळे यांनी केले आहे.