पुन्हा तेरा गोवंश वाहतूक करणारा टेम्पो पकडला

0
पुन्हा तेरा गोवंश वाहतूक करणारा टेम्पो पकडला

उदगीर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र, कर्नाटका आणि आंध्रा या तीन राज्याच्या सीमेवर असलेल्या उदगीर शहरातून मोठ्या प्रमाणात गो वंशाची चोरटी वाहतूक सुरू असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. परवाच आठ बैल क्रूरपणे वाहतूक करून कत्तलखान्याला विकण्यासाठी घेऊन जात असताना ग्रामीण पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर पुन्हा 13 गोवंशाची वाहतूक करणारा टेम्पो ग्रामीण पोलिसांनी पकडला आहे. या संदर्भात हाती आलेली माहिती अशी की, उदगीर शहरातील रिंग रोड परिसरात गोवंश जातीच्या 13 प्राण्यांना अत्यंत क्रूर व निर्दयीपणे वागणूक देऊन एका आयशर टेम्पो मधून कोंबून वाहतूक करताना आढळून आल्याने, टेम्पो सह सहा लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सामान्यतः अशी वाहतूक रात्री किंवा पहाटेच्या वेळी बिनधास्त पणे केली जाते. यासंदर्भात माहिती हाती आल्यामुळे संध्याकाळच्या वेळेस उदगीर शहरातील रिंग रोड बायपास जवळ ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून आयशर टेम्पो पकडून तपासणी केली असता त्या टेम्पोमध्ये 13 गोवंश विना पास परवाना घेऊन जात असल्याचे आढळून आले. यावरून गोपाळ अर्जुन कुडूचर या आयशर टेम्पो चालकासह फुलसिंग धावूजी राठोड, विकास व मनोहर राठोड, अशोक जयसिंग राठोड, ओम धावजी राठोड, विलास लक्ष्मण राठोड, वैजनाथ गंगाराम राठोड, सुनील मिठू राठोड यांच्या विरोधात उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देवकते हे करत आहेत.
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गोवंशाची वाहतूक होत असून यापूर्वी पकडलेल्या 31 गोवंशाचे काय झाले? हा मोठा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. तक्रारदार गोरक्षकाच्या म्हणण्याप्रमाणे पोलीस प्रशासनातीलच काही कर्मचाऱ्यांनी सदरील गोवंशाची जनावरे कत्तलखान्यात विकली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्याची कठोर चौकशी केली जावी. आणि संबंधितांना निलंबित करावे. अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे करण्यात आली आहे. त्यात भरीस भर म्हणजे परवाच आठ बैल ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये पकडण्यात आले होते. त्या पाठोपाठ आता पुन्हा 13 बैल पकडण्यात आल्याने या गोवंशाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!