सभासद आणि संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केले – सर्जेराव भांगे

उदगीर (एल. पी. उगिले) उदगीर तालुका जिल्हा परिषद सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुका म्हटले की, इच्छुकांची भाऊ गर्दी होत असते. असे असले तरी जिल्हा परिषद शिक्षक संघटनेची पतसंस्था याला एक वेगळे महत्त्व आहे. बुद्धिजीवी आणि विचारवंतांची ही पतसंस्था असल्यामुळे निश्चितपणे संस्थेचे आणि सभासदाचे हित कोण जोपासू शकते? याची जाण आणि भान सुजाण मतदारांना आहे. याच पतसंस्थेचे वाटोळे करण्याचा प्रयत्न पूर्वी झाला होता, हे जगजाहीर आहे. आता ही संस्था प्रगतीपथावर आहे. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात संस्थेचे हित आणि सभासदांचे हित विचारात घेऊन आम्ही कार्य केलेले आहे. त्यामुळे येत्या 18 तारखेला सुजाण मतदारांनी सत्यम शिवम सुंदरम पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करावे. असे आवाहन सहकार क्षेत्रातील जाणकार आणि या पतसंस्थेचे विकासाची जाण असलेले पदाधिकारी तथा पॅनल प्रमुख सर्जेराव भांगे यांनी केले आहे.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, शैक्षणिक कर्जाची मर्यादा एक लाखावरून पाच लाखापर्यंत करण्यात येईल. या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच नियमित कर्ज 20 लाख रुपयांवरून तीस लाख रुपये करण्यात येईल, व भविष्यात कर्जावरील व्याजदर कमी केला जाईल. त्या दृष्टीनेही प्रयत्न केला जाईल. तातडीचे कर्ज 50 हजारावर एक लाख रुपये करण्यात येईल. तसेच दिवाळी सणामध्ये कर्ज नाममात्र दरामध्ये 25000 रुपयांवरून पन्नास हजार रुपये करण्यात येईल, महिला ठेवीदारांसाठी ठेवीवर अर्धा टक्का अधिकचे व्याज देण्याचे ही प्रस्तावित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षक सभासदासाठी गृहनिर्माण संस्था निर्माण करून उदगीर परिसरात एक नवीन गुरुग्राम निर्माण करून सुलभ व माफक किमतीमध्ये शिक्षकांना प्लॉट व घरे उपलब्ध करून देण्यासाठी देखील प्रयत्न करण्याचे आश्वासन या पॅनलने दिले आहे.
अत्यंत पारदर्शक पद्धतीने संस्थेचा कारभार केला जाईल, इतकेच नव्हे तर नोकर भरती करताना आर्थिक व्यवहार होणार नाही. तसेच संस्थेची उपविधी दुरुस्त करून सेवा नियम बदलून सभासदांच्या पात्र पाल्यास मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्यात येईल. असेही सांगण्यात आले आहे. इतकेच नाही तर संस्थेच्या हिताचा विचार करून मागील काळात झालेल्या भ्रष्टाचाराची रक्कम 30 लाख 73 हजार 183 रुपये रक्कम 12 टक्के व्याजाने तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्याकडून वसूल करण्यात येईल, असेही आवाहन केले आहे.
वास्तविक पाहता ही पतसंस्था केवळ उदगीर तालुक्यासाठी नसून उदगीर, देवणी आणि जळकोट या तिन्ही तालुक्यांसाठी आहे. दरम्यानच्या काळात केवळ सभासदच नाही तर शाळांचाही विकास झाला पाहिजे. असा उदात्ते हेतू ठेवून तत्कालीन मंत्री तथा आमदार संजय भाऊ बनसोडे यांच्या माध्यमातून उदगीर आणि जळकोट मतदार संघाप्रमाणेच देवणी तालुक्यातील शाळांना देखील संगणकाची सुविधा उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा अट्टाहास या कार्यकारिणीने केला होता. आणि अद्यापही करत आहेत. समाजाचे हित जोपासत असताना सर्वांगीण विचार करावा या भावनेने कार्य करणारी एक टीम जमा झाल्याचेही सर्जेराव भांगे यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच शिक्षक दिनाच्या निमित्ताने 5 सप्टेंबर रोजी या तिन्ही तालुक्यातील सभासदांचा दरवर्षी सन्मान करण्याचे नियोजन ही त्यांनी जाहीर केले आहे. संस्थेच्या स्थापना दिनाच्या दिवशी 16 जून रोजी दरवर्षी ठेवीदारांचा सन्मान करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. तसेच शिक्षकांच्या वेतन देयकावरील खर्चाची प्रतिपूर्ती योजना यापुढेही चालू ठेवण्यात येईल. असेही त्यांनी जाहीर केले आहे. त्यासोबतच या पतसंस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा करून संस्थेच्या सभासद असलेल्या सभासदाची बदली लातूर जिल्ह्यात कुठेही झाली तर कर्ज वितरण करून इतर कोणत्याही पतसंस्थेची पायरी चढण्याची वेळ सभासदावर येऊ नये, या दृष्टीने विशेष कार्य करण्यासाठी प्रयत्न चालवले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्षेत्राबाहेरील सभासदांना कर्ज परतफेडी करता सुलभ व्यवस्था उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सुद्धा नियोजन केले जात आहे.
एकंदरीत आधी केले मग सांगितले याप्रमाणे आम्ही आत्तापर्यंत विविध विकास कामे केली आहेत, आणि त्याच्या जोरावर मतदारांच्या पुढे जात आहोत. असेही त्यांनी सांगितले आहे.
एन पी एस किंवा डीसीपीएस धारक सभासदाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास पतसंस्थेचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांना एक लाख रुपये देण्याची तरतूद यापूर्वीच केलेली असून त्यात यापुढे मयत कर्मचाऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून वारसास पाच लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात येईल, असेही आश्वासन वचननामामध्ये या पॅनलने दिले असल्याचे सर्जेराव भांगे यांनी जाहीर केले आहे.