शासन आणि प्रशासनाला हाताशी धरून गायरान जमिनी भोगवटा वर्ग दोन मध्ये हस्तांतरण ?

0
शासन आणि प्रशासनाला हाताशी धरून गायरान जमिनी भोगवटा वर्ग दोन मध्ये हस्तांतरण ?

उदगीर (प्रतिनिधी) 

उदगीर शहरात जमिनीचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. त्यामुळे आता काही भूमाफियाचे लक्ष गायरान जमिनीकडे वळू लागले आहे. महसूल प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांना हाताची धरून उदगीर तालुक्यातील भोगवटा वर्ग दोन गायरान जमिनी भोगवटा वर्ग एक चुकीच्या पद्धतीने बोगस दस्तावेज तयार करून संबंधित स्थानिक अधिकारी यांच्या संगनमताने भोगवटा वर्ग दोन जमीन हस्तांतरण करण्यात येऊन मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक करण्यात आली आहे, येत आहे. या गोष्टीची गांभीर्याने चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच जे कोणी शासनाची एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहेत, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे नोंद करून कठोर शिक्षा होणे अभिप्रेत आहे. आणि तशी शिक्षा व्हावी म्हणून जनाधार मोर्चा मराठवाडा उपाध्यक्ष अंबादास वसंतराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी लातूर यांना एक निवेदन दिलेले आहे. 

सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उदगीर तालुक्यातील गायरान जमिनी भोगवटा वर्ग दोन जमिनी बोगस दस्तऐवज तयार करून स्थानिक पातळीवर अधिकारी यांना संगनमत करून कोणतीही शासनाची परवानगी न घेता, मोठ्या प्रमाणात भोगवटा वर्ग दोन या जमिनीत भोगवटा वर्ग एक करून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. म्हणून उदगीर तालुक्यातील एकूण किती गावातील गायरान जमिनीत बोगस पद्धतीने कागदोपत्री भोगवटा वर्ग एक जमिनी हस्तांतरित करण्यात आले आहेत? त्याची गाव निहाय चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी आणि भूमाफिया त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी. अशी मागणी सदरील निवेदनात करण्यात आली आहे.

कवडीमोल किमतीमध्ये गावरान जमिनी ताब्यात घेऊन, त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील शेड उभारून दुकाने बांधून भू माफिया धंदा करू लागले आहेत, त्या जमिनीवर कब्जे करू लागले आहेत. सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या बगल बच्चांनी अशा पद्धतीचे धंदे केल्याची चर्चा उदगीर शहरात मोठ्या प्रमाणात चालू असून लोकांचा रोष निर्माण झाला आहे. मात्र “दाम करी काम वेड्या” या पद्धतीने हे भूमाफिया जे विरोध करतात, त्यांना खिशात घालण्याचे काम करत असल्याची ही मजेशीर चर्चा उदगीर तालुक्यात चालू आहे. जमिनीचे भाव वाढल्यामुळे आता सरकारी जमिनीवर डोळा ठेवून हे भूमाफिया मोठ्या प्रमाणात जमिनी हडप करू लागली आहेत. भविष्यात उदगीर जिल्हा झाल्यास या भूमाफियांचे पूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व राहणार आहे. कारण महसूल प्रशासनाला पेल्यात उतरवून हे व्यवहार झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे गावोगावी असलेली गायरान जमीन या भूमाफियांनी आपल्या ताब्यात घेतली आहे, असेही बोलले जात आहे. याचीही चौकशी केली जावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अगदी स्पष्टपणे केलेली ही मागणी जिल्हाधिकारी यांनी युद्ध पातळीवर चौकशी अधिकारी नेमून करावी असेही बोलले जात आहे. 

चौकट…..

चौकशी केल्याशिवाय थांबणार नाही…

उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत आता एक टोळीच गायरान जमिनी हडपण्यासाठी सज्ज झाल्याची चर्चा सुरू आहे. दुर्दैवाने ते जर सत्य असेल तर अशा पद्धतीने शासनाची फसवणूक करू भविष्यात विकास करण्यासाठी राखीव ठेवलेल्या या जमिनी हडप करणाऱ्या वर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ते कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या जाती धर्माचे आहेत हे महत्त्वाचे नाही. त्या सर्वांना विकासाला खोडा घालणारे म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. आणि अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली आहे त्यांच्या पाठीशी आपण शंभर टक्के आहोत. उदगीर पंचक्रोशीतील जनतेने सुद्धा अशा पद्धतीने आंदोलन करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे मला वाटते. 

सुधाकर संग्राम भालेराव, 

माजी आमदार, उदगीर विधानसभा मतदारसंघ.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!