चिंब भक्तीरसात नाहून निघाली फुले महाविद्यालयाची रौप्य महोत्सवी ‘समता’ दिंडी
चिंब भक्तीरसात नाहून निघाली फुले महाविद्यालयाची रौप्य महोत्सवी 'समता' दिंडी
महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अन्नदान व बिस्किटे वाटप करून वारक-यांची केली सेवा
अहमदपूर (गोविंद काळे)
‘होय होय वारकरी ।
पाहे पाहे रे पंढरी ॥१॥
काय करावीं साधनें ।
फळ अवघेचि येणें ॥ध्रु.॥
अभिमान नुरे ।
कोड अवघेचि पुरे ॥२॥
तुका म्हणे डोळां ।
विठो बैसला सांवळा ॥३॥’
असा वारीचा महिमा संत तुकोबांनी गायलेला आहे. आषाढात मेघांची गर्दी सुरू झाली की वारकऱ्यांना वेध लागतात ते पंढरीचे..! उन्हाळ्यातली शेतीची सर्व कामे करून, पेरणी करून शेतकरी वारकरी होऊन देहू- आळंदी ते पंढरी या मार्गाने चालू लागतो. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पंढरीकडे निघतात आणि सुरू होतो वारीचा नयनरम्य महाप्रवास ..!
‘ या रे या रे लहान थोर । याती भलते नारी नर ।।’ असे संत तुकोबांनी म्हटलं होतं. खरोखरच वारीमध्ये सर्व प्रकारचे भेदभाव नष्ट होतात. माणसं देहभाव विसरुन एकमेकांना माऊली माऊली म्हणतात. प्रेमाने आलिंगन देत एकमेकांच्या पाया पडतात..! सुखदुःख विसरायला लावणारी, गर्व अभिमान नष्ट करणारी, माणसाला माणुसकीची जाण देणारी एक तरी वारी अनुभवावी असं म्हणतात. ते खरं करून दाखविण्यासाठी अहमदपूर ते पंढरपूर अशी समता वारीची परंपरा मराठी साहित्यातील थोर लेखक, समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी सुरू केली आहे. यावर्षीची रौप्य महोत्सवी समता दिंडी वारीत सहभागी होऊन भक्ती रसात न्हाऊन निघाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील एक नामांकित महाविद्यालय म्हणजे अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालय…! अशी स्वतःची एक स्वतंत्र ओळख प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी महाविद्यालयाची निर्माण केली असून सलग तीन चार वेळा बी.ए. परीक्षेत विद्यापीठातून सर्वप्रथम, सर्वद्वितीय आणि सर्वतृतीय येण्याचा बहुमान महात्मा फुले महाविद्यालयाने पटकावला आहे. क्रीडा क्षेत्रातील भरघोस यशासह महाविद्यालयाच्या वार्षिक अंकालाही पुरस्कार देऊन विद्यापीठाने गौरविले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासह कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महाविद्यालयाची कामगिरी नजरेत भरणारी असून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले महाविद्यालयाने अहमदपूर ते पंढरपूर अशी दिंडी सुरू केली असून यावर्षी महाविद्यालयाने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त समता दिंडी काढून वारीत सहभाग घेतला. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधीच प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून महाविद्यालयातून सकाळीच पंढरपूरकडे दिंडीचे प्रयाण झाले.
यावेळी त्यांनी हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या वारी परंपरेचे महत्त्व सांगितले. वारकऱ्यांनी सुरू केलेला समतेचा सोहळा या जन्मात येऊन प्रत्येकाने एकदा तरी अवश्य अनुभवावा असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी समता दिंडीला किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव, पी.टी.शिंदे, ज्येष्ठ संचालक व माजी सचिव ज्ञानदेव झोडगे गुरूजींच्या वतीने देण्यात आलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.
महात्मा फुले महाविद्यालयाची समता दिंडी अहमदपूर, शिरूर ताजबंद, चाकूर, लातूर, तुळजापूर, सोलापूर मार्गे पंढरपुरात दाखल झाली. त्यावेळी पंढरपूरच्या सर्व रस्त्यांनी वारकऱ्यांचे जत्थेच्या जत्थे पंढरपुरात दाखल होत होते. त्यादिवशी कळस दर्शन घेऊन समता दिंडी शिखर शिंगणापूरच्या दिशेने निघाली. महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या शिल्पशैलीने नटलेले शिखर शिंगणापूरचे मोठे महादेव मंदिर सर्वांनी डोळे भरून पाहिले. तसेच शिवकालीन हरीहराचे मनोभावे दर्शन घेतले.
सह्याद्रीच्या प्रचंड डोंगररांगांचा अनुभव घेत माणदेश पाहून दिंडीने माळशिरस येथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी देहू आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी वारी सोहळ्यात महात्मा फुले महाविद्यालयाची समता दिंडी सहभागी झाली. माळशिरसहून वाखरी मार्गे पंढरपूर पर्यंत वारकऱ्यांसोबत पायी चालत आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला समता दिंडी पंढरपुरात दाखल झाली. दरम्यान वाखरी वाहन तळावर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना महात्मा फुले महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते चहा बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील कीर्तनकार हभप डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी वारकऱ्यांसोबत अभंग गायन आणि वीणा वादनही केले. आषाढी एकादशीच्या संपूर्ण दिवसभर पंढरीत राहून संध्याकाळी दिंडी सोलापूर जवळच्या अक्कलकोट येथे मुक्कामाला गेली. दर्शनाच्या नंतर प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, डॉ. पांडुरंग चिलगर, डॉ. दिगंबर माने, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. अनिल मुंढे, डॉ. संतोष पाटील, चंद्रकांत धुमाळे यांनी भक्तांना भोजन दानाची सेवा दिली. दुसऱ्या दिवशी सोलापूर येथील पुरातन सिद्धरामेश्वर मंदिरात दर्शन घेऊन दिंडीचे धाराशिव मार्गे तेर कडे प्रस्थान झाले.
तेर तेथील संत गोरोबाकाका समाधीचे दर्शन हा समता दिंडीसाठी मोठा आनंदाचा क्षण होता. तेर येथेच वारकरी संप्रदायातील सर्व संतांमध्ये अधिकारी आणि ज्येष्ठ असलेले संतश्रेष्ठ गोरोबा काका कुंभार यांनी भक्तीचा मळा फुलवला. त्या ठिकाणीही वारकऱ्यांनी प्रचंड गर्दी केलेली होती. काकांचे दर्शन घेऊन व पांडुरंगाने काकांना पाण्यावर तरंगणा-या वीटेचे दर्शन घेऊन दिंडी मुरुड कडे निघाली. दिंडीच्या स्वागताला किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव तथा कार्यकारणी सदस्य आदरणीय ज्ञानदेव गुरुजी झोडगे स्वतः जातीने हजर होते. दिंडीतील वारकऱ्यांना त्याच्या वतीने चहा फराळाची व्यवस्था केली होती.यावेळी दिंडीतील वारकऱ्यांतर्फे शाल श्रीफळ व महाविद्यालयाचा वार्षिक अंक देऊन ज्ञानदेव झोडगे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. शिंदे यांनी दिंडीचे स्वागत करुन समता दिंडीचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील , उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी व इतर सर्व सहभागी प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.
सायंकाळी समता दिंडी महाविद्यालयात दाखल झाली. या दिंडीचे नेतृत्व प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारी प्रमुख डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. दिगंबर माने व डॉ. किरण गुट्टे यांनी केले. दिंडीमध्ये महाविद्यालयातील सर्व पूर्णवेळ प्राध्यापक व कर्मचारी सहभागी झाले होते.ही रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेली ‘वारी’ म्हणजे चिंब भक्ती रसात न्हाऊन निघालेली ‘वारी’ होती.
