अहमदपूर-नांदेड रोडवर भीषण अपघात; बसच्या धडकेत तरूणाचा मृत्यू
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर ( गोविंद काळे ) अहमदपूर-नांदेड रोडवर एका बसच्या धडकेत एका 30 वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शंकर पुंडलिक गुणाले (रा. मरशिवणी, ता. अहमदपूर) असे मयत तरूणाचे नाव असून, या प्रकरणी बस चालकाविरुद्ध दि 14 सप्टेंबर रोजी अहमदपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अहमदपूर ते नांदेडकडे जाणाऱ्या रोडवर एमआयडीसी येथील शासकीय हॉस्टेलसमोर घटना घडली. मयत शंकर गुणाले हा त्याची स्कूटी (क्रमांक MH 24 BM 4397) घेऊन शेताकडे जात होता. त्याचवेळी, तुळजापूरहून नांदेडकडे जाणाऱ्या बस (क्रमांक MH 24 AU 7736) च्या चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून शंकरच्या स्कूटीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात शंकरच्या पायाला फ्रॅक्चर झाले आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी, शंकरचे वडील पुंडलिक सोपान गुणाले यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, भारतीय न्याय संहिता (BNS-2023) कलम 281 आणि 106(1) अंतर्गत बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बुरकुले करत आहेत.
