महात्मा फुले महाविद्यालयाची नेहा कुरील विद्यापीठाच्या सुवर्णपदकाची मानकरी…!
भूगोल विषयात विद्यापीठात सर्व प्रथम येऊन गुणवत्तेचा झेंडा फडकवला..!!
अहमदपूर (गोविंद काळे)
मार्च- एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या विद्यापीठ उन्हाळी परीक्षेत यशाचा दबदबा कायम ठेवत येथील महात्मा फुले महाविद्यालयाची बी.ए.तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु. नेहा संजय कुरील ही भूगोल विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून सर्वप्रथम आली असून ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक, तथा ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील महात्मा फुले महाविद्यालयाने गुणवत्तेचा ‘फुले पॅटर्न’ निर्माण केला असून, २०१७ पासून सातत्याने विद्यापीठ परीक्षेत महात्मा फुले महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावून विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकत आहेत.
उन्हाळी २०२५ परीक्षेत बी. ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु. नेहा संजय कुरील ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सर्व महाविद्यालयातून भूगोल विषयात सर्वप्रथम आली असून, तिला भूगोल विषयात ८३० गुण मिळाले आहेत. नुकतीच विद्यापीठाची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, कु. नेहा कुरील हिला विद्यापीठातर्फे प्रा. डॉ. बी.जी. वेळापूरकर सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते कु. नेहा कुरील आणि तिच्या पालकांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थीनी कु. नेहा कुरील, तिची आई, आजोबा तसेच मार्गदर्शक प्राध्यापक, भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. दिगंबर माने, डॉ. सचिन गर्जे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
