मराठीच्या संवर्धनासाठी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत – प्रा. शिवाप्पा पाटील
बॅ. पी. जी. पाटील वाचनालयात अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा
सातारा (प्रतिनिधी) : अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त सातारा येथील बॅ. पी. जी. पाटील सार्वजनिक वाचनालय, गोडोलीमध्ये आज (ता. ४) रोजी आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते प्रा. शिवाप्पा पाटील यांनी मराठी भाषेच्या अभिजाततेचा गौरव करत 'मायमराठी चळवळ' गतिमान करण्याचे आवाहन केले. मायमराठी ही आपली ओळख असून ही आत्मसन्मानाची चळवळ महाराष्ट्रीय लोकांनी गतिमान केली पाहिजे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, असे प्रतिपादन श्री. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. पाहुण्यांचे स्वागत आणि प्रस्ताविक ग्रंथपाल रोहिणी राव यांनी केले. याप्रसंगी वाचनालयाचे सचिव डॉ. प्रियांका साबळे, उपाध्यक्ष राजेंद्र साबळे, श्री. निंबाळकर, संचालक एम. जी. निकम यांच्यासह सुजाता पाटणे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल प्रमुख वक्ते तथा यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे भाषा शिक्षक शिवाप्पा पाटील यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांमध्ये भाषाप्रेम वाढविण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी 'वाचाल तर वाचाल' हा मौलिक संदेश आत्मसात करुन विपूल प्रमाणात मराठी साहित्य वाचावे, असा सल्ला दिला. प्रा. शिवाप्पा पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, 'मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून संस्कृती, विचार आणि आत्मसन्मानाचे प्रतिबिंब आहे.' मराठी ही स्वराज्याची भाषा आहे, शूरवीरांची गर्जना आहे, ज्ञानेश्वरांचे ओवीबद्ध तत्त्वज्ञान आणि तुकोबांचा अभंगरूपी संदेश आहे. या भाषेने स्वातंत्र्याच्या लढ्याला शब्द दिले आणि लोकांना प्रेरणा दिली. अशा प्रेरक मराठी भाषेला जीवापाड जपलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला जीवापाड जपलं. तिला राज्यभाषेचा मान दिला. आजच्या पिढीने त्या परंपरेला डिजिटल युगातही पुढे नेले पाहिजे आणि मायमराठीचा डंका जगभरात घुमवला पाहिजे. यासाठी 'मायमराठी चळवळ जोमाने उभी राहिली पाहिजे, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, शिक्षण, प्रशासन, प्रसार माध्यमांत मराठीचा अचूक वापर वाढविणे हीच खरी भाषासेवा आहे.
दरम्यान श्री. छ. राजमाता जिजाऊ प्राथमिक न. प. शाळा क्र. २३, गोडोलीच्या विद्यार्थ्यांनी मराठी गीत, कविता, पोवाडे, म्हणी उखाण्यांद्वारे भाषेप्रती प्रेम व्यक्त केले. शेवटी सहाय्यक ग्रंथपाल शकुंतला कारंडे यांनी सर्वांचे आभार मानले.
