उजना सिध्दी शुगरचा १४ वा गळीत हंगाम थाटात सुरू; ऊसउत्पादकांना मिळणार रु. २,८५० ते रु. २,९०० प्रति टन दर
अहमदपूर( गोविंद काळे ) सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज, उजना चा २०२७-२६ चा १४ वा गळीत हंगाम शुभारंभाचा मुहुर्त आणि ऊस विकास परिषद शनिवार, दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी धनत्रयोदशीच्या शुभमुहुर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक मा.श्री. बाळासाहेबजी जाधव (माजीमंत्री), राज्याचे सहकारमंत्री ना. बाबासाहेबजी पाटील, व्यवस्थापकीय संचालक अविनाशभैय्या जाधव, विस्माचे अध्यक्ष तथा नॅचरल शुगरचे व्यवस्थापकीय संचालक मा.श्री. वी.वी. ठोंबरे यांच्या शुभहस्ते गव्हाणीत ऊस टाकून मुहूर्ताचा कार्यक्रम पार पडला.
तत्पूर्वी, प्रगतशील शेतकरी श्री. अविनाश देशमुख व त्यांच्या पत्नीच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली. या कार्यक्रमास मा.श्री. डॉ. बाळकृष्ण जमदग्नी (वरीष्ठ ऊस संशोधन शास्त्रज्ञ, कोल्हापूर), मा.श्री. वी.पी. पाटील (वरीष्ठ कृषीशास्त्रज्ञ, कोल्हापूर), मा.श्री. अरुण पडोळ (बारामती) आणि एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर मा. श्री. अजीत चौगुले यांची विशेष उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या घामाचा सन्मान:
मुहूर्त कार्यक्रमानंतर लगेचच ऊस विकास परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना राज्याचे सहकारमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत कारखान्याने प्रगतीचा मार्ग निवडल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या श्रमाचा आणि सहकार भावाचा सन्मान म्हणून, सिध्दी शुगर साखर कारखाना २०२७-२६ हंगामाकरीता ऊसउत्पादकांना रु. २,८५०/- ते रु. २,९००/- प्रती मेट्रिक टन एवढा दर देईल, असे त्यांनी जाहीर केले. गेल्या १३ हंगामातील सरासरी रिकव्हरी, साखरेचे व इथेनॉलचे बाजारातील दर तसेच तोडणी व वाहतूक खर्च विचारात घेऊन हा दर निश्चित करण्यात आला आहे.
सहकारमंत्री पुढे म्हणाले की, “आपला साखर कारखाना केवळ साखर उत्पादक संस्था नसून, तो शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा आणि स्थैर्य निर्माण करणारा केंद्रबिंदू आहे.” शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी खचून न जाता राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी नॅचरल शुगरचे व्यवस्थापकीय संचालक व विस्माचे अध्यक्ष श्री. बी.वी. ठोंबरे यांनी कारखान्याच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वरीष्ठ ऊस संशोधन शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांनी सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान यावर, तर वरीष्ठ कृषिशास्त्रज्ञ वी.पी. पाटील यांनी हवामान बदल व पीक उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. अरुण पडोळ यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा ऊस शेतीमधील वापर याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमास नॅचरल शुगरचे संचालक श्री. पांडुरंग आढाव, शक्तीमान हार्वेस्टरचे संचालक माणिकराव पाटील, सिध्दी शुगरचे संचालक आणि विविध विभागाचे महाव्यवस्थापक, तसेच ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी चोपणे यांनी केले, तर आभार कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. पी. जी. होनराव यांनी मानले.
