काँग्रेसकडून फायदा लाटलेलेच दलबदलू काँग्रेसला बदनाम करत आहेत – प्रा. उदयसिंह पाटील

0
काँग्रेसकडून फायदा लाटलेलेच दलबदलू काँग्रेसला बदनाम करत आहेत - प्रा. उदयसिंह पाटील


उदगीर (एल पी उगिले) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता हळूहळू अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पुढे येत आहेत. त्यापैकी काही पक्षातील पुढारी म्हणउन घेणारे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचेच लाभार्थी होते, काँग्रेस पक्षाकडून अनेक वेळा फायदे लाटल्यानंतर कधी जातीच्या नावावर तर कधी धर्माच्या नावावर पक्षांतर करून आता काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. मात्र जनता त्याला भीक घालणार नाही. असा विश्वास प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रा. उदयसिंह पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकतीने लढल्या जातील, असा विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस पक्षाने फार मोठा त्याग केलेला आहे. काँग्रेसला त्यागाची परंपरा आहे. देशाच्या विकासामध्ये तंत्रज्ञानाचा क्रांतिकारी बदल काँग्रेस पक्षाने आणला आहे. सर्वधर्मसमभाव ही विचारधारा घेऊन चालणारा आणि सर्वसामान्यांचे हित जोपासणारा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. आज जरी वेगवेगळ्या पक्षात आपण फार मोठे आहोत असे सांगणारे नेते निर्माण झाले असले तरी त्यांनी आत्मपरीक्षण केल्यास त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेस पासूनच झालेली आहे, काँग्रेसमध्ये लाभ घेतल्यानंतर ते पुन्हा काँग्रेस पासून दूर जाऊन आता काँग्रेसवर टीका करण्याचा वेडेपणा करत आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांचे हित जपणाऱ्या काँग्रेसला ते बदनाम करू शकणार नाहीत. सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने दिली जात आहेत, जातीयवादी संघटन सतत हाच प्रयत्न करत असते, देश पातळीवर भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षांतर्गत मतभेद निर्माण करणे, काँग्रेसचे सत्ता स्थान असलेल्या राज्यांमध्ये पक्ष फोडणे, पक्षाला कमजोर करण्यासाठी पक्षातील पदाधिकाऱ्यांना ईडी, सीबीआयची भीती दाखवणे. असे प्रकार करून काँग्रेस पक्षातील बहुतांश नेते भाजपमध्ये गेले आहेत. कित्येकांनी पिढ्यान पिढ्या काँग्रेस मधून लाभ उचलल्यानंतर देखील आज काँग्रेसवर टीका करत आहेत, हे हास्यास्पद आहे. असेही विचार प्रा उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केले आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारांचा विचार केल्यास समाजवादी विचाराला मानणारा वर्ग फार मोठा आहे. मात्र दुर्दैवाने गेल्या काही निवडणुकांमध्ये वेगवेगळी प्रलोभने देऊन मतदारांना फसवले गेले आहे. मात्र आता मतदार राजा हुशार झाला आहे. सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस दिलेली आश्वासने आज पूर्णपणे फोल ठरली आहेत.
शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिली जाणारी रक्कम त्याची घोषणा एक आणि प्रत्यक्ष दिलेली मदत एक अशा पद्धतीने सतत फसवणूक करणे हाच प्रकार चालू असल्याने, लोक आता हुशार झाले आहेत. शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेकार, बेरोजगार हे सर्वच आता सजग होऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करतील. असा विश्वासही प्रा. उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
नुकतेच एका राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेस पक्षाला भाजपाची ब टीम म्हणण्याचा प्रकार केला आहे.
वास्तविक पाहता उदगीर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचेच वर्चस्व आहे. अंतर्गत गटबाजी आणि आपसातील मतभेदामुळे गेल्या निवडणुकांमध्ये धोका झाला, मात्र आता महाविकास आघाडी एकसंघपणे निवडणूक लढवणार असल्याने काँग्रेस पक्षाला निश्चितपणे यश मिळेल. असाही विश्वास उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!