वेगवेगळ्या लाच प्रकरणांत दोन पोलीस अधिकाऱ्यांसह चौघांना अटक
नाशिक (प्रतिनिधी) : तक्रार अर्जावरून कारवाई न करण्यासाठी २७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जायखेडा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह खासगी व्यक्ती, तर दुसऱ्या प्रकरणात वाढीव पोलीस कोठडी न मागता इतर गुन्ह्यत अटक न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मालेगावच्या आझादनगर पोलीस ठाण्यातील साहाय्यक निरीक्षकासह पोलीस नाईक यांना अटक झाल्यामुळे ग्रामीण पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तक्रार अर्जावरून कारवाई न करता मदत करण्यासाठी २७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नामपूर दूरक्षेत्रात कार्यरत उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे याच्यासह रमेश गरुड या रिक्षाचालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तक्रारदाराविरुद्ध नामपूर दूरक्षेत्रात तक्रार अर्ज दाखल आहे. या अर्जावरून कारवाई न करता मदत करण्यासाठी उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे आणि रिक्षाचालक रमेश गरुड यांनी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. याविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळापूर्व पडताळणी केली. तेव्हा संशयित उपनिरीक्षक नवगिरे आणि गरुड यांनी लाच मागितल्याचे उघड झाले. तडजोडीअंती २७ हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना दोघांनाही पकडण्यात आले. नवगिरे आणि गरुड यांच्याविरुद्ध जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरे प्रकरण मालेगावच्या आझादनगर पोलीस ठाण्यातील आहे. या पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यत पोलीस कोठडीची मुदत न वाढविण्यासाठी आणि दुसऱ्या गुन्ह्यत अटक न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी साहाय्यक निरीक्षक प्रदीप आव्हाड आणि पोलीस नाईक सुनील ऊर्फ आप्पा पाडवी या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या संदर्भात गुन्हा दाखल असलेल्या संशयिताच्या पत्नीने तक्रार दिली होती. आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यत पतीला वाढीव पोलीस कोठडीची मागणी न करता मदत करणे आणि दुसऱ्या गुन्ह्यत अटक न करण्यासाठी पाडवी आणि आव्हाड यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळापूर्व पडताळणी केली. तेव्हा पाडवी आणि आव्हाड यांनी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले.