कार्यकर्त्यांचा मान आणि सन्मान वाढवणार – नागनाथ बोडके
उदगीर (प्रतिनिधी) : संपूर्ण लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मान आणि सन्मान वाढला पाहिजे, यादृष्टीने आपण विशेष प्रयत्न करणार आहोत. असे उद्गार राष्ट्रीय समाज पक्षाचे नवनिर्वाचित युवा जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके यांनी काढले.
नागनाथ बोडके यांची निवड झाल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरातून ठीक ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला जात आहे. या सत्काराला उत्तर देताना बोडके म्हणाले की, पक्ष संघटनेशी प्रामाणिक राहून कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षांमध्ये सन्मानाची पदे आणि कार्य सोपवले जाईल. पक्षसंघटन वाढीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण जिद्दीने लढू या, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या विचारांची शिदोरी घेऊन आपण ग्रामीण भागात काम करू या. आपण गोरगरिबांचे प्रश्न सोडवून काम करू, समाजातून निश्चितपणे पक्ष संघटनेला बळकटी येईल, असाही विश्वास त्यांनी याप्रसंगी बोलून दाखवला.
याप्रसंगी परमेश्वर सोमवंशी, उद्धव, गायकवाड, राज गायकवाड, बळवंत सोनकांबळे, राहुल तपसाळे, बिरू कल्याणकर, सूर्यकांत भोसले, वैभव बाजूळगे, राजकुमार साताळे, गोविंद सताळे, रवी सताळे, मष्णाजी पाटील, बाळू कर्ले, खंडू कर्ले, बळीराम गाडेकर, उत्तम कर्ले, मोहन कर्ले, अमर सुरवसे, अतुल बसपुरे, नामदेव आवडलकोंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
नागनाथ बोडके यांच्या नियुक्ती बद्यल संपूर्ण जिल्ह्यातून आनंद व्यक्त केला जात असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.