अहमदपूर तालुक्यात काळ्या आईचा उत्सव पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा

अहमदपूर तालुक्यात काळ्या आईचा उत्सव पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यात काळ्या आईच्या सन्मानाचा उत्सव असलेला वेळ अमावश्येचा सण रविवार ( दि ०२) पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा सण शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्वाचा आहे. अगदी सकाळ पासूनच शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांची कुटुंबासह घाई होती. आज सकाळपासून शहरांतून ग्रामीण भागाकडे जाणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलले होते. परिणामी शहरांत दिवसभर शुकशुकाट होता. शेतकऱ्यांनी शेतात एक खोप (कोप) तयार करून त्याच ठिकाणी धान्याची आणि मांडलेल्या पांडवांची पूजा करून एका अर्थाने वनराईची भक्तीभावाने पूजा केली. या पुजेसाठी नैवाद्य ही खास असतो. त्यामध्ये , शेंगदाण्याचे लाडू, बोरे, जांभ, हरभऱ्याची ओली भाजी, ताक, लसूण व भाकरीच्या पीठापासून तयार केलेले अंबील, विविध भाज्या एकत्र करून तयार केलेली भज्जी आणि ज्वारी, गहू, बाजरीचे (सजगुर्याचे) उंडे याचा समावेश असतो. गोड पदार्थ म्हणून तिळगुळाची पोळी आणि गव्हाची खीर असते. त्याच प्रमाणे काही ठिकाणी पांढरी ज्वारी सडुन तयार केलेला आंबटभात ही असतो. आंबील वाटीत घेऊन शेतकरी भाऊ-भाऊ , पिता-पुत्र, आजा-नातू आदी पुऱूष पुजेभोवती प्रदिक्षणा घातल्या. यावेळी “इडापिडा टळू दे, बळीचं पाज्य येऊ दे” असा घोष करण्यात आला. या पुजेचे वैशिष्ठ म्हणजे यात कुठलेच पौराहीत्य नसतात. उघड्यावरच ज्योत पेटवली जाते. स्वत: बळीराजा ही पूजा करतो.
पूजा झाल्यानंतर आग्रहाने निमंत्रित केलेल्या मित्र, पाहून्यांच्या जेवणाच्या पंगती बसतात. त्यामुळे शनिवारी तालुक्यातील शेतशिवार माणसाने फुलून निघाला होता. वेळ अमावस्या निमित्त शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह मित्र परिवार यांच्यासोबत वनभोजनाचा आस्वाद घेतला. वेळ अमावस्या मुळे अहमदपूर शहरासह तालुक्यात अघोषित संचारबंदी झाल्याची परिस्थिती होती.

रानमेव्याचा आस्वाद !

एरवी कधीतरी शेताकडे येणारी सर्व मंडळी या सणानिमित्त शेताकडे जातात. सध्या शेतात तुर, हरभरा, गहु, ज्वारी पिक असल्यामुळे त्यांनी तुरीच्या शेंगा, ढाळे, वाटान्याच्या शेंगा, ऊस, गव्हाच्या ओम्ब्या यासह बोरं या रान मेव्याचा आस्वाद घेतला. तसेच काही हौसी लोकांनी शेतातील मोहाळाची शिकार करून त्याच्या मधाचा आस्वाद घेतला.

          या दिवशी सायंकाळी कडब्याच्या पेटत्या पेंड्या हातात घेऊन शेतक–यांकडून आपापल्या शेताला प्रदक्षिणा घातली. यामुळे पिकावर रोगांचा प्रार्दुर्भाव होत नाही अशी धारणा आहे.

अमावस्या सणाची संस्कृती

मुळ कर्नाटकातील असणारा वेळ अमावास्या हा सण महाराष्ट्रातील लातुर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही आमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द “येळ्ळ अमावस्या” म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. त्यामुळे या दिवशी सर्व जण आवर्जून येतात. व या सणाचा आनंद घेतात.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!