दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
लातूर (प्रतिनिधी) : मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत विवेकानंद चौक पोलिसांच्या हवाली केले आहे.
सविस्तर माहिती अशी की, मागील दोन वर्षांपूर्वी लुटमारी आणि हाफ मर्डर च्या गुन्ह्यातील ज्या आरोपीच्या शोधात पोलीस होते तो सदरील नितीन शिवदास भालके (२१, रा. सिध्दार्थ अपार्टमेंट, आदर्श कॉलनी, लातूर) हा येळवस जेवण्यासाठी लातूर जिल्ह्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. बहुरे, अंगद कोतवाड, राजेश कंचे, मस्के, शेख, नितीन कठारे आदी औसा रोडवरील नंदी स्टॉप परिसर येथे गेले असता तेथे सदर तरुण हा आढळून आला. त्याला ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्याने स्वतःचे नाव नितीन शिवदास भालके असल्याचे सांगितले. सदरील इसमाच्या विरोधात लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदरील इसमास तात्काळ अटक करुन विवेकानंद चौक पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.