बारावीतील विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून

बारावीतील विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून

लातूर (श्रीमंत होळे) : बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लातुरातील विशालनगर भागात भररस्त्यावर घडली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी पाच संशयित मित्रांना ताब्यात घेतले आहे. लातूरमधील मोतीनगर भागात वास्तव्याला असलेला रोहन सुरेश उजळंबे (२०) हा मूळचा लोदगा (ता. औसा) येथील रहिवासी आहे. तो बारावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. विशालनगरातील साई मंदिराशेजारच्या रस्त्यावर रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तो थांबला होता. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी एकाने रोहनच्या गळ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि जमिनीवर कोसळला. त्यानंतर मारेकरी मोटारसायकलवरून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहनला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

About The Author