वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई बंद करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन
निलंगा (प्रतिनिधी) : शेतकर्यांकडे थकलेले वीजबील वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने वीज उपकेंद्रातूनच वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शेतकर्यांच्या शेतात रब्बी हंगामाची पिके व फळबागा उभ्या आहेत. त्यांना सध्या पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पाणी न मिळाल्यास पिके जळून जाण्याचा धोका आहे. यामुळे देशाची अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. म.रा.वि.वि कंपनीने देशाच्या अन्न सुरक्षा कायद्याचा भंग केला आहे. विज कायद्यानुसार योग्य दाबाने वीज पुरवठा न केल्याने व १५ दिवस आगोदर नोटीस न दिल्यामुळे वीज कायद्याचा भंग केला आहे. व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. २०१२ पासून शेती पंपांना वाढीव वीजबिले देउन शेतकर्यांची व सरकारची फसवणूक केली आहे. पोलीस वीज कंपनीवर गुन्हा दाखल करण्यास तयार नाही. मात्र शांततेत आंदोलन करणार्या शेतकर्यांवर ३५३ कलमा खाली खोटे गुन्हे दाखल केले आहेत.
शेतीमालाचे भाव जर सरकारने पाडले नसते तर शेतकर्यांनी वीजबील भरले असते पण निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा, वायदेबाजार बंदी, राज्यबंदी करून शेतीमालाचे भाव सरकारने शेतीमालाचे भाव पाडले आहेत. शेतकरी सरकारचे देणे लागत नाही उलट शेतकर्यांना वीज वितरण कंपनी कडून येणे आहे.
मंगळवार दि.1 फेब्रुवारी पासून राज्यभरातील तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालया समोर बेमदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजे पर्यंत आंदोलन सुरु राहील.
वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम त्वरीत बंद करावी. विज बिले दुरुस्त करून द्यावीत. जळलेली रोहित्र तत्काळ बदलून द्यावे. इगतपुरीच्या शेतकर्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे. व बेकायदेशीर कारवाई करणार्या वीज वितरणच्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागण्यासाठी शेतकरी संघटनेच्या व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव,उपाध्यक्ष वसंत कंदगुळे, कल्याण हुरदळे, युवा नेते विवेक पाटील, दत्ता पाटील, करण भोसले, अजिंक्य पाटील, राम मसलगे, दयानंद पाटील, गणेश पाटील, नारशिव घंटे, राहुल माने, मनोज पटके, माणिक पाटील, शाहू सुर्यवंशी, शिवाजी घोडके, राम शंके, अंतराम मुस्के आदिंसह शेतकरी उपस्थित होते.