दारू गुटखा बंद करण्याची मानसिकता कोणत्याही राजकारण्यांमध्ये नाही: स्वातीताई मोराळे
लातूर ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्रामध्ये गुटखा बंद होऊन सात आठ वर्षे झाली असतील, परंतु सर्रास प्रत्येक गावात व प्रत्येक टपरीवर आजही खुले आम गुटखा विक्री केली जात आहे. जर सरकार कोरोना काळात संपूर्ण देश जाग्यावर ठप्प करु शकतो, तर मग गुटखा विक्री कशी बंद होऊ शकत नाही? असा प्रश्न सामाजिक करकर्त्या स्वातीताई मोराळे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे त्या असेही म्हणतात, पुढाऱ्यांची हि मानसिकता कधीच बदलू शकणार नाही. नियम व कायदे बनवायचे परंतु त्यांची अमलबजावणी कधीच होऊ द्यायची नाही. बंदी घालायची व तीच वस्तू दहा पटीने अधिक किंमतीत उपलब्ध करून द्यायची, व मलीदा खायचा.
उत्तर प्रदेश मध्ये एक गुटखा विक्रतेच्या घरी तीनशे कोटी पेक्षा जास्त संपत्ती सापडते, याला प्रशासन व पुढारी यांची साथ नक्कीच असणार आहे.
वाईन दुकानात मिळणार या कायद्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाईनला दुकानात विक्रीला परवानगी द्यायची की नाही? यामुळे दारू पिणाऱ्याचे प्रमाण वाढेल का? आणि शेतकऱ्यांना याचा खरचं फायदा होईल का? याची उत्तरे शोधण्याच्या अगोदर दारू गुटखा बंदी पुढाऱ्यांना हवी आहे का हा खरा प्रश्न आहे. आणि दारू गुटखा बंद करण्याची मानसिकता कोणत्याही राजकारण्यांमध्ये नाही असे वाटते.