पुर्णवेळ भाजपाच्या कार्यात रहाण्यासाठीच लिंगायत नेते शिवानंद हैबतपूरेंचा बसव परिषदेला राजिनामा
उदगीर (प्रतिनिधी) : आमच्या प्रश्नांची सोडवणूक ही सत्तेच्या माध्यमातूनच होऊ शकते. समाजातील छोट्या छोट्या घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यासाठी सत्तेचे राजकारण आवश्यक आहे. आणि हे राजकारण लोकशाही प्रधान अशा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच होऊ शकते. म्हणूनच येणाऱ्या काळात पुर्णवेळ भाजपाच्या कार्यात स्वतःला झोकून देण्याचा संकल्प लिंगायत नेते शिवानंद हैबतपूरे यांनी व्यक्त केला. उदगीर येथे आयोजित लिंगायत समाजाच्या बैठकीत हैबतपूरे यांनी आपल्या लिंगायत चळवळीचा कार्यभार हा बसवेश्वर गुडपे यांच्या कडे सोपवला. त्या बैठकीत बोलताना हैबतपूरे म्हणाले की यापुढे लिंगायत आंदोलनास व विविध उपक्रमास मला फारसा वेळ देता येणार नाही. एका जबाबदार अशा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला पुर्ण वेळ काम करता यावे यासाठीच मी महाराष्ट्र बसव परिषदेच्या कार्यातून विनम्रपणे मुक्त होत आहे. आजपर्यंतच्या माझ्या सामाजिक कार्याच्या प्रवासात भालकी हिरेमठ संस्थानचे प.पू.बसवलिंग पट्टदेवरु व सहकारी शरणांचे मला मोलाचे सहकार्य मिळाले. मी सदैव त्यांचा ऋणी आहे. यापुढे भाजपाच्या विचाराशी एकनिष्ठ राहून भाजपा तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी मी कटिबद्ध आहे. भाजपाच्या विचाराशी व कार्यपद्धतीशी मी बांधील आहे. महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस तथा प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मा.आ.गोपिचंद पडळकर तथा मा.आ.अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा ही शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी मी सदैव तत्पर असेन. माझ्या लिंगायत समाजासोबतच सकल बहुजनांच्या प्रश्नांची सोडवणूक ही केवळ भाजपाच करु शकते हे आपण विसरता कामा नये. प्रस्थापित घराणेशाहीच्या विळख्यात अडकेल्या इथल्या राजकारणाला लोकशाहीचा मोकळा श्वास फक्त भाजपाच्या कार्यपद्धतीतच घेता येईल. राष्ट्र सर्वतोपरी श्रेष्ठ आहे आणि राजकारण हे अंत्योदयी असले पाहिजे हे भाजपाचे तत्वज्ञानच आज बहुजन समाजाला तारणारे असून बहुजन तरुणांनी भाजपात झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. ही काळाची गरज ओळखून मी पुर्णवेळ भाजपाचे कार्य करण्यासाठीच महाराष्ट्र बसव परिषदेचा व समता संदेश पदयात्रेच्या संयोजक पदाचाही राजिनामा दिल्याचे हैबतपूरे यांनी सांगितले.
याप्रसंगी या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून पदयात्रा सेवा समिती चे कार्यवाह प.पूज्य. पंचय्या स्वामी होरांडीकर,
बसव अनुभव मंटपाचे अध्यक्ष मा.हणमंतप्पा औरादे, समता संदेश पदयात्रेचे संयोजक मा.बसवराज गुडपे,समितीचे सदस्य संजय पाटील, निळकंठ पाटील ताकबिडकर, विश्वनाथ मोरगे, बसव कथाकार शिवसांब होनराव, विष्णूकांत राऊतराव, शिवसांब देशमुख कौठेकर, संतोष स्वामी मठपती, बसवराज स्वामी मळभागे, भगवान चिवडे, किरण पांडागळे, निखिल स्वामी मठदेवरु, आकाश मडिवाळ आदी मान्यवर उपस्थित होते.