लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यातील आगामी दिवाळी सण शांततेत, सुरक्षित आणि निर्भय वातावरणात साजरा व्हावा, तसेच सणासुदीच्या काळात होणाऱ्या चोरी, घरफोडी, वाहनचोरी व इतर गुन्ह्यांना प्रतिबंध घालता यावा, यासाठी लातूर पोलीस विभागाच्या वतीने व्यापक सुरक्षा नियोजन करण्यात आले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा, व्यापारी संकुले, गर्दीची ठिकाणे, प्रमुख चौक तसेच निवासी परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यासोबतच अचानक नाकाबंदी, कोंबिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी आणि विशेष पोलीस पेट्रोलिंग राबविण्यात येणार आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येत आहे. ई-पोलीस क्यू आर कोड स्कॅनिंग प्रणालीच्या माध्यमातून शहरातील ३७९ ठिकाणांवरील पोलीस गस्तीचे निरीक्षण करण्यात येणार असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून विविध भागांतील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संशयास्पद हालचालींवर त्वरित लक्ष देऊन आवश्यक ती कारवाई करणे शक्य होणार आहे.
प्रतिबंधात्मक कारवाईतून गुन्हेगारीला आळा
सन २०२६ मध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत लातूर शहर उपविभागात गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी विविध कायद्यांनुसार मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये कलम १२६ बीएनएसएस अंतर्गत २,११२, कलम १२८ अंतर्गत १३, कलम १२९ अंतर्गत १४९, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ ते ५७ अंतर्गत ६०, कलम १२२ अंतर्गत ३६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ९३ अंतर्गत १५४, एमपीडीए कायद्यांतर्गत १०, तर कलम १६३ बीएनएसएस अंतर्गत १९३ प्रतिबंधात्मक कारवायांचा समावेश आहे.
आगामी दिवाळी सणाच्या काळातही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांनीही घ्यावी सुरक्षेची काळजी!
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत जाताना नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू, दागिने व पैशांची विशेष काळजी घ्यावी. सणानिमित्त बाहेरगावी जाताना घराच्या सुरक्षिततेची योग्य खबरदारी घ्यावी. घराला व्यवस्थित कुलूप लावावे तसेच वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करून लॉक करावीत. परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
लातूर शहरातील नागरिकांनी सणासुदीच्या काळात सतर्क राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. नागरिकांची सुरक्षा, मालमत्तेचे संरक्षण आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेत सुरक्षित, आनंदी आणि निर्भय वातावरणात दिवाळी सण साजरा करावा, असे आवाहन लातूर शहर उपविभागीय पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.














Responses (0 )