उदगीर (प्रतिनिधी) उदगीर येथील भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी म्हणून विद्यमान आमदार संजय बनसोडे यांनी कोट्यावधीचा निधी आणला आहे. कारण हा किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक गौरवशाली पान आहे. पानिपतच्या युद्धावर निघालेल्या मराठ्यांच्या सैन्याचे सेनापती भाऊसाहेब पेशवे यांना बनवण्यामध्ये या किल्ल्याच्या इतिहासाचे सोनेरी पान आहे. 3 फेब्रुवारी 1760 रोजी याच किल्ल्यावर मराठ्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. तो गौरवशाली इतिहास जपला जावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपये दिलेले आहेत. मात्र या कामासाठी कंत्राटदार अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचा आरोप भारतीय दलित पॅंथर संघटनेने केला आहे. या किल्ल्यामध्ये उदगीर पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उदागीर बाबाची समाधी आहे. हे एक भक्ती स्थळ आहे. या ठिकाणच्या कामाच्या दर्जाच्या संदर्भात विचार करून कंत्राटदाराने भाविक भक्तांच्या श्रद्धेला गालबोट लागेल असे काही करू नये. अशी रास्ता अपेक्षा भारतीय दलित पॅंथर संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी उदगीर यांच्यामार्फत शासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
सदरील निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नगरपालिका मुख्याधिकारी, तहसीलदार आणि संबंधित अधिकारी यांना दिलेल्या आहेत.
सदरील निवेदनाची दखल घेऊन उदगीर येथील उपविभागीय अधिकारी यांनी सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग नांदेड यांना पत्र देऊन कळवले आहे की, भारतीय दलित पॅंथरचे नामदेव बामणे व मराठवाडा उपाध्यक्ष निवृत्ती भाटकुळे यांनी उदगीर येथील किल्ला दुरुस्तीचे काम चालू आहे, ते निकृष्ट होत असल्याने ठेकेदार बदलावा. यासाठी धरणे आंदोलन चालू केले असून तशा आशयाचे निवेदन दिलेले आहे. सदरील मुद्द्याचा गांभीर्याने विचार करून योग्य ती चौकशी करून नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, आणि आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आंदोलनापासून परावर्त करावे. असे पत्र दिलेले आहे.
असे असतानाही अजूनही सदरील कारवाई गुलदस्त्यात असल्यामुळे भारतीय दलित पॅंथर च्या कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या अनुषंगाने वेळीच योग्य ती कारवाई नाही झाल्यास भारतीय दलित पॅंथर च्या स्टाईल मध्ये तीव्र आंदोलन केले जाईल. असाही इशारा निवृत्तीराव भाटकुळे, नामदेव बामणे, अक्षय सावंत यांनी दिला आहे.














Responses (0 )