Police Flash News

कपिलधार यात्रेसाठी पायी दिंड्यांना पाण्याचे टँकर व वाहतूक पोलीस बंदोबस्त द्या – शिवकुमार केदारी यांची मागणी

0
19
कपिलधार यात्रेसाठी पायी दिंड्यांना पाण्याचे टँकर व वाहतूक पोलीस बंदोबस्त द्या – शिवकुमार केदारी यांची मागणी

परळी वैजनाथ | (प्रतिनिधी)

श्रीक्षेत्र कपिलधार (जि. बीड) येथे संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ स्वामी यांच्या कार्तिक पौर्णिमा यात्रेनिमित्त महाराष्ट्र व कर्नाटकातून येणाऱ्या पायी दिंड्यांतील हजारो भाविकांसाठी बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केल्यापासून पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत. तसेच दिंड्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रमुख मार्गांवर वाहतूक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा, अशी आग्रही मागणी वीरशैव विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार राजेश्वर आप्पा केदारी यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

श्रीक्षेत्र कपिलधार येथे २४ नोव्हेंबर २०२६ रोजी संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ स्वामी यांच्या कार्तिक पौर्णिमा यात्रेचे आयोजन होत आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध भागांतून ७० पेक्षा अधिक पायी दिंड्या अनेक दिवसांचा प्रवास करून कपिलधार येथे दाखल होतात. या दिंड्यांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व हजारो शिवभक्त सहभागी असतात.

सध्याची बीड जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती व पाणीटंचाई लक्षात घेता पायी प्रवास करणाऱ्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने यात्रेपूर्वीच दिंडी मार्गांचे नियोजन करून प्रत्येक दिंडीला जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केल्यापासून कपिलधार येथे पोहोचेपर्यंत आवश्यकतेनुसार स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

दिंड्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलीस तैनात करा!

अनेक पायी दिंड्या राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग व वर्दळीच्या रस्त्यांवरून प्रवास करतात. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रमुख चौक, धोकादायक वळणे व दिंडी मार्गांवर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात यावा. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित सर्व पोलीस ठाण्यांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशीही मागणी केदारी यांनी केली आहे.

निवेदनात एकूण नऊ प्रमुख मागण्यांचा समावेश असून, दिंडीप्रमुखांशी समन्वय साधणे, मुक्कामस्थळी पाण्याची व्यवस्था करणे, पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करणे, स्वतंत्र संपर्क अधिकारी व नियंत्रण कक्ष नियुक्त करणे तसेच महसूल, पोलीस, आरोग्य व पाणीपुरवठा विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

"संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ स्वामी यांच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या शिवभक्तांना पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागू नयेत. भाविकांची सेवा करणे ही केवळ धार्मिक बाब नसून मानवतेचे कर्तव्य आहे. प्रशासनाने यात्रेपूर्वीच योग्य नियोजन करून प्रत्येक दिंडीला पिण्याचे पाणी व सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी," अशी भावना शिवकुमार केदारी यांनी व्यक्त केली.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts