लातूर (एल पी उगीले)
पाणीटंचाई आणि भविष्यातील पाणी संकटाची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी, तसेच पाण्याचा काटकसरीने वापर आणि जलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने पोलीस स्टेशन शिरूर अनंतपाळ व पंचायत समिती शिरूर अनंतपाळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर अनंतपाळ शहरात भव्य 'जल साक्षरता दिंडी' काढण्यात आली. या दिंडीत सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश दिला.
या उपक्रमात शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा शिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक जाधव यांनी स्वतः सहभागी होत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. पोलीस विभाग आणि पंचायत समितीच्या संयुक्त पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जलसंवर्धनाच्या विषयाला व्यापक लोकसहभागाची जोड मिळाली.
दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्ये, पथनाट्ये आणि जनजागृतीपर संदेशांच्या माध्यमातून पाणी बचतीचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल असून पाण्याचा अपव्यय टाळणे, पावसाचे पाणी अडविणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि उपलब्ध पाण्याचा जपून वापर करणे ही काळाची गरज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
पाणीटंचाई ही केवळ शासन किंवा प्रशासनाची समस्या नसून तिचे निराकरण करण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा विचार घराघरांत आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न होता.
पाणी वाचविणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांचे जीवन सुरक्षित करणे. आजपासूनच पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याची सवय अंगीकारली, तरच उद्याचे पाणीसमृद्ध भविष्य घडू शकते, हा महत्त्वपूर्ण संदेश या जल साक्षरता दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला.
या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जलसंवर्धनाच्या सामाजिक चळवळीला हातभार लावला.














Responses (0 )