लातूर (एल पी उगीले)
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन चाकूरच्या वतीने ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत धावून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
देशाची एकता, अखंडता आणि बंधुभाव अधिक दृढ व्हावा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना, सामाजिक सलोखा आणि देशाप्रती कर्तव्यभावना निर्माण व्हावी, या उद्देशाने या एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने धाव घेत राष्ट्रीय एकात्मतेप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.
या दौडचे विशेष आकर्षण म्हणजे चाकूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भंडे यांनी स्वतः विद्यार्थ्यांसोबत धावून या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. पोलीस निरीक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष धाव घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक वाढला. केवळ संदेश देण्यापुरते मर्यादित न राहता स्वतः कृतीतून राष्ट्रीय एकात्मतेचा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
राष्ट्रीय एकात्मता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकाच्या आचरणातून व्यक्त झाली पाहिजे. देशाची एकता आणि अखंडता जपणे ही प्रत्येक भारतीयाची सामूहिक जबाबदारी आहे, हा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे एकता दौड उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राष्ट्रीय एकात्मतेची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी चाकूर पोलिसांनी राबविलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.














Responses (0 )