काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. व्यंकटराव बेद्रे यांच्या हाती राष्ट्रवादीचा झेंडा
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई येथे राष्ट्रावादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या हस्ते लातूरचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष ॲड. व्यंकटराव बेद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला. प्रशांत घार, औसा तालुक्याचे एमआयएमचे नेते अफसर अब्बास शेख, माजी नगरसेविका सौ. छायाताई चिंदे, जलीलनाना शेख, उस्मान शेख, ॲड. प्रदीप गंगणे, ॲड. अभिजीत मगर यांनी दि. 4 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.
लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे. जनाधार वाढवायचा असेल तर बहुजन समाजाचे अनेक मान्यवर नेते पक्षात आले पाहिजेत. केवळ लातूरच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात पक्षाची ताकद वाढायला हवी. ज्यांची पक्षात येण्याची इच्छा आहे त्यांचे स्वागत करून सन्मानाने वागवण्याची भूमिका आमची आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढण्यासाठी व्यंकटरावांचे सहकार्य नक्कीच लाभेल, हा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.
लातूर जिल्ह्यात राजा मणियार यांच्यासारखा एकच नगरसेवक आहे. आता लातूरमध्ये नगरसेवकांची संख्या वाढेल असे काम व्हायला हवे. शहराच्या विकासासाठी हा पक्षप्रवेश अधिक प्रभावी ठरेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वाढणारा पक्ष आहे. दर गुरुवारी कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यातील पक्ष प्रवेश हा होत आहे. त्यामुळे आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाचे आकर्षण अनेकांना असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वाभिमानातून निर्माण झालेला पक्ष आहे. पक्षाच्या स्थापनेपासून महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास आपण घेतला आहे. पक्षस्थापनेनंतरच्या सहा महिन्यातच आपण सत्तेत आलो आणि महाराष्ट्राच्या विकासावर भर दिला. आपला पक्ष कोण कधी आलं हे न पाहता नेतृत्व कौशल्य पाहून संधी देत असतो. त्यामुळे व्यंकटरावजी तुम्ही काळजी करू नका.”
लातूर भागात पाण्याचा प्रश्न फार मोठा होता. त्यावर आपल्या सरकारने फार यशस्वीरीत्या काम केले आहे. सामाजिक प्रश्न कधीही संपत नसतात, एक प्रश्न संपला की दुसरा प्रश्न उद्भवत असतो. ऊसाच्या लागवडीच्या प्रश्नावरून आजही लातूर भागातला शेतकरी चिंताग्रस्त आहे, त्यासाठी विशेष काम केले पाहिजे, असेही अजितदादांनी सांगितले. लातूरला करस्वरूपात मिळायला हवा असणारा पैसा केंद्र सरकारकडून फार अपुऱ्या स्वरूपात मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून अतिरिक्त निधी कसा देता येईल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असल्याचे अजितदादांनी सांगितले.
लातूरमध्ये वातावरण राष्ट्रवादीमय होण्याकरता जे जे करणे शक्य होईल ते आपण करूया. व्यंकटराव आजपासून तुमच्यावरील जबाबदारी वाढली आहे. उद्या तुमच्या हातून चांगलं काम झालं तर त्याचा फायदा पक्षालाच होणार आहे. त्यामुळे जबाबदारीने काम करा आणि आपल्या शब्दामुळे कोणी दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. लातूरच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध राहूया, असे आवाहन अजितदादांनी केले.
यावेळी राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, आमदार सुनील शेळके, आमदार अमोल मिटकरी, आमदार विक्रम काळे, कोषाध्यक्ष ना. हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सचिव संजय शेटे, प्रदेश सचिव अख्तर मिस्त्री, लातूर शहराध्यक्ष मकरंद सावे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, नगरसेवक राजा मणियार, जिल्हा सरचिटणीस ॲड. किरण बडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित धुमाळ उपस्थित होते.