पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या दोन तरुणींना मारहाण करत ठेवल कोंडून; पुण्यातील घटना

पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या दोन तरुणींना मारहाण करत ठेवल कोंडून; पुण्यातील घटना

पुणे (प्रकाश इगवे) : पेईंग गेस्ट तरुणींना डांबून ठेवत घर सोडण्यास सांगितल्यानंतर त्यांचे पंधरा दिवस अगोदरच पाणी बंद करून त्यांना मारहाण करणाऱ्या घरमालकीणीसह दोघींवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृप्ती सूर्यकांत माने आणि श्वेता उज्ज्वल थोरात (दोघीही रा. ओम शांती ओम पीजी गुरूकृपा, अनुसया पार्क, खराडी) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २० वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दाखल गुन्ह्यानुसार, तृप्ती माने ही तिच्या खराडी येथील घरात मुली पेईंग गेस्ट ठेवण्याचे काम करते. तर फिर्यादी ही पुण्यातील एका कॉल सेंटरमध्ये काम करते. दोन महिन्यांपूर्वी ती तृप्ती माने हिच्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहात होती. ती आणि तिची चुलत बहीण पहिल्यापासून तिथे राहात होती. डिपॉझिट स्वरूपात फिर्यादीने चार हजार रुपये तर भाडे स्वरूपात दरमहा ती ३ हजार ८०० रूपये देत होती. मानेची दोन्हीही तरूणींबरोबरची वागणूक चांगली नव्हती. महिना संपण्याअगोदरच ती भाडे घेत होती. याच तिच्या वागणूकीला कंटाळून दोघी बहिणींनी तिची खोली सोडण्याचा निर्णय घेतला होता. मानेला खोली सोडत असल्याबाबत व डिपॉझिटची मागणी केली असता, तिने पंधरा दिवस अगोदरपासूनच त्यांचे पाणी बंद केले. जेव्हा त्यांच्या जाण्याची वेळ आली, तेव्हा बाहेर पडण्याचे गेट बंद करून घेत त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांनी मित्राच्या मदतीने आपली सुटका करून घेत याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात येत फिर्याद दिली आहे.

About The Author

error: Content is protected !!