आगामी काळ हा स्त्रियांच्या कर्तृत्त्वाचाच असेल – अयोध्याताई केंद्रे

आगामी काळ हा स्त्रियांच्या कर्तृत्त्वाचाच असेल - अयोध्याताई केंद्रे

अहमदपूर (गोविंद काळे) : सध्याचा काळ हा स्त्रियांसाठी अत्यंत कठीण आणि खडतर संघर्षाचा असला तरी, आगामी काळ हा स्त्रियांच्या सन्मानाचा आणि कर्तृत्वाचाच असेल,असे स्पष्ट प्रतिपादन अहमदपूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. अयोध्याताई केंद्रे यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘ जागर स्त्रीशक्तीचा; सन्मान स्त्री कर्तृत्वाचा ‘ या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार प्रा. डॉ. बालाजी कारामुंगीकर हे उपस्थित होते यावेळी विचारपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी. डी. चौधरी, कार्यक्रमाचे संयोजक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे, सत्कार मूर्ती आशा भराडिया, कल्पना जोंधळे, डॉ. कान्होपात्रा क्षीरसागर, विद्यादेवी टाळकुटे, सारिका सोनकांबळे, डॉ. सुचिता कापसे, इंदुमती वाघमारे, माजी नगरसेवक निसिरा बेगम कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आयोध्या ताई केंद्रे म्हणाले की, मुलींच्या शिक्षणासाठी सध्याचा काळ प्रतिकूल असला तरी मुलींनी येणाऱ्या संकटांना सामोरे गेले पाहिजे. अनेक अडचणी असल्या तरी शिक्षणात खंड पडू देऊ नका, स्वतःच्या पायावर उभी राहिल्याशिवाय शिक्षण बंद करू नका असेही त्यांनी याप्रसंगी आवाहन केले.

यावेळी महाविद्यालयाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आशा भराडिया साहित्य), कल्पना जोंधळे (कंडक्टर) , डॉ. कान्होपात्रा क्षीरसागर (संशोधन ), विद्यादेवी टाळकुटे (सामाजिक ), सारिका सोनकांबळे (अंगणवाडी मदतनीस), डॉ. सुचिता कापसे (वैद्यकीय), इंदुमती वाघमारे (सफाई कामगार) आणि निसरा बेगम कुरेशी (सामाजिक) अशा विविध क्षेत्रातील आठ महिलांना ‘जिजाऊ – सावित्री कार्य गौरव पुरस्कार ‘ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. बालाजी कारामुंगीकर म्हणाले की, स्त्रियांच्या योगदानामुळेच समाज व्यवस्था टिकून राहिलेली असून, समाजाने स्त्रियांबद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे. केवळ एक दिवस नाही तर दररोज स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, स्त्री- पुरुष समानता हा केवळ लिहिण्याचा किंवा बोलण्याचा विषय नसून, समाजात आणि घरी दारी प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा विषय आहे. जोपर्यंत महिलांचा सर्वांगीण विकास होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक महिला दिनानिमित्त अयोध्या ताई केंद्रे यांच्यावतीने महाविद्यालयातील उपस्थित सर्व मुली महिलांना पुष्पगुच्छ आणि स्टाॅल देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी सत्कारमूर्तींच्या वतीने आशा भराडिया, कल्पना जोंधळे, डॉ. कान्होपात्रा क्षीरसागर, विद्यादेवी टाळकुटे, सारिका सोनकांबळे, निसार बेगम व सुचिता कापसे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ. सतीश ससाणे यांनी केले. पुरस्कार प्राप्त पाहुण्यांचा परिचय डॉ. पांडुरंग चिलगर यांनी करून दिला तसेच सूत्रसंचालन डॉ.अनिल मुंढे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मारोती कसाब यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील र्विद्यार्थी, पालक, कर्मचारी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author