घराघरात स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे – पुष्पाताई लोहारे

घराघरात स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे - पुष्पाताई लोहारे

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय संस्कृती जगात महान असून या देशात विविधतेतून एकात्मता साधली जाते. म्हणूनच महाराष्ट्राच्या भूमी मधील प्रत्येक कुटुंबातील घराघरात दररोज स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे असे आग्रही प्रतिपादन शांतिनिकेतन वेतन धारी सेवकांची पतपेढी च्या माजी चेअरमन पुष्पाताई लोहारे यांनी केले. त्या दि 08 मार्च रोजी यशवंत विद्यालयात यशवंत कोटा पॅटर्न च्या वतीने जागतिक महिला दिना निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नगरीच्या नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे, नांदेडच्या प्रीमियम फिटनेस क्लब च्या प्रमुख मीरा धुळगुंडे, मुख्याध्यापक व्ही.व्ही. गंपले, उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे, कोटाचे समन्वयक खयूम शेख सह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे म्हणाल्या की महिला आता सर्व क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक भरारी घेत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर विशेष लक्ष देऊन आपले जीवन घडवावे असे जाहीर आवाहन केले. यावेळी कोटा पॅटर्नच्या वतीने व रोहित इन्फोटेक सेंटर च्या वतीने विविध स्पर्धेतील गुणवंताचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, ट्रॉफी व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले, माजी विद्यार्थिनी मीरा धुळगुंडे, सहशिक्षिका प्रतिभा कुलकर्णी, खयूम शेख यांचे मनोगत पर भाषणे झाली. प्रास्ताविक राजकुमार पाटील यांनी, सूत्रसंचालन वर्षा माळी व कपिल बिरादार तर आभार रामलिंग तत्तापूरे यांनी मानले. महिला दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत कोटा पॅटर्नच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author