आंतर महाविद्यालयीन रस्सीखेच स्पर्धेत महात्मा फुले महाविद्यालयाचे यश
अहमदपूर (गोविंद काळे) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने नांदेड येथील सायन्स महाविद्यालयात संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन रस्सीखेच स्पर्धेत येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक पटकावला असून, या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. याबाबतची अधिक माहिती अशी की, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मुलींसाठी आंतर महाविद्यालयीन रस्सीखेच स्पर्धा नांदेड येथील सायन्स महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बाजी मारत द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल महाविद्यालयात त्यांचा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विद्यार्थिनींना क्रीडा विभाग प्रमुख प्रो.डॉ. अभिजित मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल त्यांचाही सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या यशस्वी संघामध्ये मेघा ससाणे, प्रिया शिंदे, विश्वनंदा नंदवंशी, ऐश्वर्या रेचेवाड, जुफिशा शेख, वर्षाराणी नरवटे, सुप्रिया साबळे, धनश्री कांबळे, मनीषा सुरनर, गीता दोडे या विद्यार्थिनींचा सहभाग होता.
या सत्कार प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी , प्रो.डॉ. नागराज मुळे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. पांडुरंग चिलगर आणि कार्यालयीन अधीक्षक श्री. प्रशांत डोंगळीकर हे उपस्थित होते.